ठाणे - पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा व २० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्काराप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे. मात्र, धावत्या ट्रेनमध्ये घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत रविवारी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस व आयपीएसची भेट घेतली आणि घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवला.
अभिजित धुरत यांना बजावली नोटीस
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याने महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अभिजित धुरत यांना नोटीस बजावली होती. पुष्पक एक्सप्रेस दरोडा-अत्याचाराचा निषेध नोंदविण्यासाठी कल्याण येथे सर्वांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, याबाबत सोशल मिडीयामार्फत आवाहन केले होते. एमएफसी पोलिसांनी या आवाहनाची गंभीर दखल घेतली. लोकांची गर्दी जमून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच लोक एकत्रित आल्याने समूह संसर्ग होऊन कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गर्दी न जमवता आपण आपल्या मागण्यांसंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळासह लोहमार्ग पोलिसांना निवेदन सादर करावे, असा सल्ला दिला. अशा प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास, त्याबाबत जबाबदार धरून आपणाविरुद्ध कारवाई करण्यात येईल असाही इशारा एमएफसी पोलिसांनी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अभिजित धुरत यांना दिला.
हेही वाचा - राज्यातील सर्वात सक्षम वन्यजीव पथक म्हणून अमरावतीचा पथकाचा नावलौकिक; शेकडो वन्यप्राण्यांना दिले जीवनदान