ठाणे - ठाणे जिल्ह्यात लंपी या विषाणुजन्य आजाराने ( Lumpy disease in Thane District ) शिरकाव केला आहे. जिल्यातील अनेक तालुक्यातील गावांमध्ये जनावरांना लंपी या विषाणुजन्य आजाराची लागण झाल्याची बाब आता समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट ( District administration alert ) झाले असून बाधित क्षेत्रातील दहा किलोमीटर परिघातील परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जनावरांचे लसीकरण देखील सुरू करण्यात आले असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. ( Animal Husbandry Department is ready to fight Lumpy Skin Disease )
या हद्दीतील जनावरांना बाधा : ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत १४ जनावरे लंपी विषाणूजन्य आजाराने बाधित झाली आहेत. यामध्ये अंबरनाथ, शहापूर येथील आसनगाव आवाळे व चेरपोली, तसेच भिवंडी येथील धामणगाव व भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या हद्दीत जनावरांना बाधा झाली असल्याचे निदर्शनास आले असून त्यांचे रक्तजल नमुने व इतर तत्सम नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. सदर जनावरांच्या नमुन्यांची चाचणी ९ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आली त्यामुळे ठाणे जिल्ह्यात लंपी स्किन डिसीज या रोगाचा शिरकाव झाला असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
काय घ्यावी काळजी : लंपी स्किन डिसीज हा विषाणू ने होणारा रोग असून तो झूनोटीक रोग नाही म्हणजेच जनावरांपासून माणसाला हा रोग होत नाही. या रोगाची लक्षणे म्हणजे जनावर खाणं पिणं सोडून देतो किंवा कमी खातो तसेच त्याला ताप येतो, डोळ्यातून व तोंडातून चिकट स्त्राव येतो, पायाला सूज येते आणि अंगावर १० - २० मिमि च्या गाठी निर्माण होतात. परंतु हा रोग संसर्गजन्य असल्याने हा एका जनावरांपासून दुसऱ्या जनावराला या रोगाचा संसर्ग होऊ शकतो त्यासाठीचा खबरदारीचा उपाय म्हणून जे जनावर या रोगाने आजारी आहे त्यास ताबडतोब वेगळे केले पाहिजे व नजीकच्या पशुवैद्य केंद्राला त्याची सूचना दिली पाहिजे. पशुवैद्यकाकडून बाधित जनावराची उपचार करून घेणे तसेच माशा गोचीड व इतर तत्सम कीटक यांच्यापासून दुसऱ्या जनावरांना याचा संसर्ग होऊ नये यासाठी कीटकनाशक फवारणी करून घेणे आवश्यक आहे. सदर रोगाच्या नियंत्रणासाठी गोठ्यांमध्ये जंतुनाशक फवारणी करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
४ हजार जनावरांना झाले लसीकरण : जी जनावरे पॉझिटिव्ह आली त्या जनावरांपासून पाच किलोमीटरच्या परिघाच्या क्षेत्रातील सर्व जनावरांचे १०० टक्के लसीकरण करण्यात येणार असून ही प्रक्रिया जिल्यात सुरू झालेली आहे. आतापर्यंत जवळजवळ ४ हजार जनावरांना लसीकरण करून झालेले आहे. बाधित तालुक्यांमध्ये इतरत्र लंपीचे जनावरे आढळल्यास ताबडतोब त्याच्या आजूबाजूतील पाच किलोमीटर परिघातील सर्व जनावरांचे १०० टक्के लसीकरण करण्यात येईल असे पशुवैद्यकीय विभागाने स्पष्ट केले.
लढा देण्यास पशुसंवर्धन विभाग सज्ज : १३ सप्टेंबर रोजी भिवंडी येथे तीन जनावरे बाधित आढळले असून शहापूर तालुक्यात किनवली अस्नोली व पाषाणे येथे एकूण पाच जनावरे बाधित आढळली आहेत. अशाप्रकारे ठाणे जिल्ह्यात एकूण १४ बाधित जनावरे आतापर्यंत आढळली आहेत या रोगाच्या रोखथामीसाठी पर्याप्त लस शासनाकडून उपलब्ध झालेली आहे. तसेच जिल्हा परिषदेकडून दहा हजार लसीची मागणी केलेली आहे. कल्याण व मुरबाड तालुक्यात या रोगाची लक्षणे दिसल्यास त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येतील. लंपी स्किन डिसीज या आजाराशी लढा देण्यास पशुसंवर्धन विभाग सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.