ठाणे - ठाण्यात कोरोनाबाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असले तरी, रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील हॉटस्पॉटची संख्या पुन्हा १६ झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १६ हॉटस्पॉटमध्ये ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन कायम असल्याचे महापालिकेने काढलेल्या अध्यादेशात स्पष्ट केले आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत.
ठाणे शहरात अनलॉकनंतर सर्वकाही आलबेल झाले असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवण्यास सुरूवात केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात तीन परिमंडळात १६ ठिकाणे कोरोनाची हॉटस्पॉट (प्रतिबंधित क्षेत्र ) निश्चित केली आहेत. त्यामुळे आता कोरोनाला अटकाव घालण्यासाठी या १६ हॉटस्पॉटमध्ये येत्या ३१ मार्चपर्यंत पुन्हा लॉकडाऊन असेल, असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
हे परिसर असणार टारगेट-
यामध्ये परिमंडळ एकमधील कळवा प्रभाग समिती क्षेत्रात विटावा, आईनगर, सुर्यनगर, खारेगाव परिसर हे हॉटस्पॉट आहे. तर,परीमंडळ दोनमध्ये चेंदणी कोळीवाडा, वागळे व श्रीनगर परिसर हॉटस्पॉट आहेत. परिमंडळ ३ मध्ये सर्वाधिक हॉटस्पॉट असुन यात माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील, बाळकुम, लोढा व लोढा आमारा, हिरानंदानी इस्टेट, हिरानंदानी मेडोज गृहसंकुले आणि लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात दोस्ती विहार, शिवाई नगर, कोरस टॉवर, कोलबाड, रुस्तुमजी ' वृदांवन येथे लॉकडाऊन ३१ मार्चपर्यंत ठेवण्यात आला आहे. हॉटस्पॉट वगळता इतर ठिकाणी राज्य शासनाच्या नियमांतर्गत सर्व व्यवहार सुरळीत राहतील, असेही अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा- राज्यात सोमवारी 8 हजार 744 नवे कोरोनाबाधित; 22 रुग्णांचा मृत्यू