ठाणे - शहापूर तालुक्यातील कसारा घाटात पाणवठ्याच्या शोधात बिबट्याचा मुंबई-नाशिक या मुख्य महामार्गावर मुक्त संचार सुरू आहे. बिबट्याच्या या मुक्त संचाराने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. या महामार्गावरुन शिर्डीला जाणाऱ्या साई पदयात्रींची संख्या लक्षणीय असल्याने सर्वाधिक भीती पायी चालणाऱ्यांमध्ये पसरली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर रात्रीच्यावेळी बिबट्याचा मुक्त संचार सुरु असल्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पुण्याचे भिमाशंकर अभयारण्य आणि अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाईच्या जंगलातून बिबटे कसारा घाटाच्या प्रदेशात येत आहेत. कसारा घाटापासून जवळच अंतरावर मध्यवैतरणा जलाशय आणि तानसा हे सुरक्षित अभयारण्य आहेत. पाणवठ्याची निसर्गनिर्मित व्यवस्था तानसा अभयारण्यात उपलब्ध आहे. म्हणूनच सध्याच्या उष्ण उन्हाच्या झळांपासून स्वतःच्या बचावासाठी बिबटे तानसातील पाणवठ्यांकडे येत आहेत. मात्र, त्यांना कसारा घाटातील मुंबई-नाशिक महामार्ग ओलांडावा लागत असल्याने बिबट्यांचे दर्शन होत आहे.
महामार्गावरील संचाराने बिबट्यांना देखील धोका निर्माण झाला आहे. भरधाव वाहनांच्या धडकेने २०१८ मध्ये कसारा घाटात २ बिबट्यांना अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. बिबट्याचा महामार्गावर असाच संचार सुरु राहिल्यास २०१८ मधल्या अपघाती मृत्यूच्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे. महामार्गावर बिबट्याच्या संचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कसारा घाटातून प्रवास करतांना काळजी घेण्याच्या विशेष सूचना निर्गमित केलेल्या नाहीत. तर, राज्याच्या वन्यजीव खात्याच्या ठाणे विभागाकडून बिबट्याच्या संचारावर उपाययोजना आखण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत कसारा विहिगांव परिसरातील वनक्षेत्रपाल, प्रियांका उबाळे यांच्याशी संपर्क साधला असता मुंबई - नाशिक महामार्गावर कसारा घाटात बिबट्या आढळून आला आहे. या महामार्गावर दिवसा-रात्री वनकर्मचाऱ्यांचे दक्षता पथक कार्यरत ठेवण्यात आले आहे. तसेच स्थानिक गावकऱ्यांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.