ठाणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता राज्यात झपाट्याने होत आहे. मुंबई, ठाणे आदी शहरात तर कोरोनाचा प्रसार अधिक गतीने होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी एसटी महामंडळाचे दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, यातूनही एसटी महामंडळाने कोणतेही धडा घेतल्याचे दिसत नाही.
ठाणे शहरातील एसटी आगारामध्ये संपूर्ण राज्यातून दररोज शेकडो एसटी चालक आणि वाहक येत असतात. त्यांना राहण्यासाठी महामंडळाचे रेस्ट हाऊस आहे. परंतु, या रेस्ट हाऊसची अवस्था अतिशय दयनीय आहे. कोरोनाच्या काळात तर येथे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासोबत खेळ होत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा... संतापजनक... मेळघाटात आठ महिन्यांच्या बाळाला गरम विळ्याचे चटके
महामंडळाच्या रेस्ट हाऊसमध्ये इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्थित राहण्याची सोय नसल्याचे दिसत आहे. तसेच त्यांच्यासाठी इतर प्राथमिक सोईसुविधांचा देखील अभाव असल्याचे दिसत आहे. अत्यंत कमी जागेत हे सर्व कर्मचारी एकमेकांच्या जवळ जसे जमेल तसे अंग टाकून झोपत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगला तर हरताळ फासल्याचे चित्र दिसत आहे.
सरकारी आदेश डावलून कामगारांना काढून टाकले जात असल्याचा आरोप देखील कर्मचाऱ्यांनी केला आहे. महामंडळाने रेस्ट हाऊसबाबत योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्याची विनंती कर्मचाऱ्यांनी केली आहे. यात आणखी भर म्हणून की काय एसटी कर्मचाऱ्यांचे ठाणे आणि मुंबई भागात काम करणाऱ्यांचे वेतन एप्रिल महिन्यापासून थकवले आहे, असेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.