ठाणे - उद्धव ठाकरे संपत्ती लपवतात, धनंजय मुंडे संतती लपवतात आणि प्रताप सरनाईक अनधिकृत बांधकामात व्यस्त आहेत अशी खोचक टीका करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले. सरनाईकानी बांधलेल्या विहंग गार्डन 'बी' हे तेरा मजल्यांचे दोन टॉवर अनधिकृतपणे बांधले आणि त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही यावर संतप्त झालेल्या सोमय्या यांनी ठाणे महापालिकेच्या दारातच ठिय्या आंदोलन केले.
२००८ साली बांधलेल्या विहंग गार्डन या इमारती ला अनधिकृत ठरवत महापालिकेने त्यावर तीन कोटी ३३ लाखांचा दंड ठोठावला. आजमितीला व्याजसहित दंडाची रक्कम ११ कोटी रुपये झाली असून प्रताप सरनाईक यांनी केवळ २५ लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली जी महापालिकेने मंजूर केली, असे संतापलेल्या सोमय्या यांनी सांगितले. सत्तेत असल्याने सरनाईक यांना ही विशेष सवलत दिल्याचे सांगत सोमय्या यांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाईची मागणी करत महापालिकेच्या दारात बसून आंदोलन केले. त्यांच्या सोबत भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांनी महाविकासाआघाडी आणि सरनाईक यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नौपाडा पोलिसांनी सोमय्या आणि भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
किरीट सोमय्या आक्रमक -
मागील काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ईडी कडे तक्रारी केल्या असून त्याबाबत ते आक्रामक झालेल्या आहेत. किरीट सोमय्या यांच्यावर ठाणे जिल्ह्याचे संपर्क नेत्याचा पदभार आहे. त्यामुळे ठाण्यात त्या अनेकदा आंदोलन करताना दिसून येतात.