ठाणे - मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पळवून नेलेल्या ७ वर्षीय मुलाची सुखरूप सुटका, गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने मध्य प्रदेश मधील इटारसी येथून केली. या अपहरण प्रकरणी २४ जानेवारीला मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी रेश्मा कुमार राठोड (वय ३० रा. दिवा, मुंब्रा ) या ७ वर्षीय मुलगा लकी राठोड आणि रिंकू सरोज याच्यासोबत राहत होती. रिंकू सरोज याने फिर्यादी रेश्मा हिला उत्तर प्रदेशात येण्यास सांगत होता. मात्र रेश्माने नकार दिल्याने रिंकू सरोज याने मनात राग धरून फिर्यादी रेश्माचा मुलगा लकी याचे अपहरण करून युपी येथे निघून गेला. या प्रकरणाची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल होताच गुन्हे शाखा युनिट-१ चे पथकप्रमुख नितीन ठाकरे यांनी गुन्ह्यात तपास सुरू केला. यात सदर आरोपी हा रेल्वेने प्रवास करणार असल्याचे दिसून आले.
दरम्यान पोलीस उपनिरीक्षक अशोक माने यांच्यासह एक पथक या प्रकरणी तपासासाठी रवाना करण्यात आले. तत्पूर्वी प्रयागराज रेल्वे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मीनल, पोलीस उपनिरीक्षक अमित दिवेदी यांच्याशी संपर्क करण्यात आला. तसेच इटारसी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र आणि पथक यांच्या मदतीने आरोपी रिंकू दयाशंकर सरोज (वय ३५ रा. बिरपट्टी ग्यानपूर रोड, संत रोहिदास नगर, उत्तर प्रदेश) यास अपहरण केलेल्या मुलासह ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली.
हेही वाचा - ठाण्यात जुगार अड्ड्यावर गुंडांचा हैदोस; तरुणावर चाॅपरने हल्ला
हेही वाचा - डोंबिवलीतील रिचर्स सेंटरची भीषण आग मध्यरात्री शमली; 38 संशोधक थोडक्यात बचावले