ठाणे - एकीकडे लॉकडाऊन काळातील विजबील सर्वसामान्यांसह व्यापार्यांकडून वसुलीची धडक मोहीम महावितरणने सुरू केली असतानाच, एका रसवंतीगृहाच्या वीज मीटरमधूनच कल्याण-डोंबिवली महापालिका अधिकाऱ्याने चोरीछुपे वीज कनेक्शन घेतल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रसवंतीगृहाच्या मालकाने महावितरण अधिकाऱ्याकडे पुराव्यासह वीजचोरीची तक्रार दाखल करताच केडीएमसीच्या अधिकाऱ्याने मात्र चोरीचे खापर ठेकेदारावर फोडले आहे. भागाजी भांगरे असे तक्रार दाखल झालेल्या अधिकार्याचे नाव आहे.
प्रभाग अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली इमारतीचे पाडकाम सुरू
कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोरच पन्नास वर्षांपूर्वीची जर्जर झाल्याने ही इमारत महापालिकेने अति धोकादायक घोषित करून या मुस्तफा मंजिल नावाच्या इमारतीला जमीनदोस्त करण्याचे काम महापालिकेचे 'क' प्रभाग अधिकारी भागजी भांगरे यांच्या देखरेखीत गेल्या पाच दिवसांपासून जेसीबी, पोकलेन, वेल्डिंग मशीनच्या साह्याने तसेच रात्रीच्या वेळी विजेचे दिवे लावून इमारतीचे पाडकाम सुरू आहे. मात्र या सर्वांना लागणारा वीजपुरवठा या इमारती लगत असलेल्या गणेश रसवंती गृहाच्या वीज मीटरमधून मालकाची परवानगी न घेता, चोरीछुपे त्यांच्या वीज मीटरमधून वायरी जोडून सुरू होता. मात्र आज सकाळी वीज मीटरमधून दुसरीकडे जाणाऱ्या वायरी रसवंतीचे मालक धनंजय शिंदे यांच्या निदर्शनास पडल्या. त्यांनी तत्काळ महावितरणचे कार्यालय गाठत पालिका अधिकारी भागाजी भांगरे यांच्या विरोधात वीज चोरीची तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना कुठल्याही प्रकारची अपघातापासून बचावासाठी सुरक्षेचे साधन दिले नसल्याचेही आढळून आले आहे.
महावितरण करणार कायदेशीर कारवाई
कल्याण पश्चिम विभाग महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दिगंबर राठोड यांच्याशी संपर्क साधला असता तक्रार अर्जाची शहानिशा करून वीज चोरी प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे उपकार्यकारी अभियंता प्रसाद कोहरे यांनी घटनास्थळी पंचनामा करून चोरून लावलेल्या वायरी जप्त केले आहे. तर प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांनी सांगितले, की जरी महापालिका धोकादायक इमारतीचे पाडकाम करीत आहे. तरी मात्र या कामासाठी नेमलेल्या ठेकेदाराने हा वीज चोरीचा प्रकार केल्याचे सांगत वीज चोरीच्या प्रकरणातून आपला बचाव करण्यासाठी चोरीचे खापर ठेकेदारावर फोडल्याचे दिसून आले आहे.