ठाणे- आम्ही स्टंट करतो, असे म्हणणारे विनोद तावडे हे स्वत:ला कोकणवासीय म्हणवतात. पण, त्यांनी महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या तिवरे दुर्घटनेचा ‘विनोद’ केला आहे. एकीकडे सबंध कोकण दु:खात असताना कोकणपूत्र तावडे यांनी उद्यान उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करुन असंवेनशीलतेचे प्रदर्शन घडवले आहे. त्यामुळे त्यांनी आधी कोकणवासीयांची माफी मागावी. नंतर पुढचे बोलावे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तावडेंच्या टीकेला उत्तर दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या ’खेकडा’ आंदोलनावर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी टीका केली होती. त्यांनी आव्हाड हे स्टंट करीत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या टीकेचा आव्हाडांनी समाचार घेतला आहे. ते म्हणाले, तावडे यांना टीका करण्याचा नैतिक अधिकारही उरलेला नाही. तावडे हे कोकणी असल्याचे सांगतात. मात्र, आपला कोकणी माणूस तिवरे धरण फुटल्यानंतर निर्माण झालेल्या पुरामध्ये वाहून गेल्याचे साधे सोयसुतकही त्यांना राहिलेले नाही. एकीकडे तिवरे पंचक्रोशीत शोककळा पसरलेली असताना तावडे हे उद्यान उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजनच कसे काय करतात? दोन दिवस हा कार्यक्रम पुढे ढकलला असता तर अवकळा आली नसती. धरणफुटीत दगावलेल्यांच्या चिता विझलेल्या नसताना आणि काहींच्या चिता तर पेटलेल्या नसताना, बेपत्ता असलेले अनेकजण सापडलेले नसताना स्वत:ची ‘शान’ दाखवण्यासाठी तावडे यांनी हा बेशरमपणा केला आहे. संपूर्ण कोकण दु:खात अश्रू ढाळत असताना तावडेंना आनंद साजरा करण्याचे धैर्य कुठून आले? असा सवाल करुन, शिक्षणाचा विनोद केलेल्या या माणसाने आता असा कार्यक्रम आयोजित करुन जनतेच्या दु:खाचाही ‘विनोद’ केला आहे. धरणफुटीत बुडून दगावलेल्यांच्या अंत्ययात्रा निघत असताना तावडे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन करीत होते. धरणफुटीत दगावलेल्यांची राखही सावडली नसताना तावडे यांचे हसणारे दात सबंध महाराष्ट्राला दिसत होते.
तिवरे-भेंदेवाडीतील लोकांच्या पोटात अन्नाचा कण नसताना हे तावडे हे आनंदामध्ये नाश्त्यावर ताव मारीत होते. तेथील लोक पाण्यासाठी मोताद झालेले असताना हेच तावडे उद्घघाटनाच्या कार्यक्रमात चहा-कॉफी-कोल्ड्रींगचे प्याले रिचवत होते. भेंदेवाडीतील बांधव स्मशानात असताना या सरकारमधील मंत्री उद्यानात रमत होते. इतका असंवेदनशील मंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिलेला नाही. तावडे हे कोकणातील असूनही त्यांना कोकणी माणसाबद्दल अजिबात संवेदना राहिलेली नसल्याचेच दिसून येत आहे. हा बेशरमपणा करण्याआधी आपण ज्यांच्यामुळे पद आणि प्रतिष्ठा उपभोगत आहोत, त्यांचे काही तरी देणेकरी लागतो, याचेही भान त्यांना नाही. त्यामुळे जर त्यांच्यात थोडीतरी 'जाण' असेल तर मयताचा ‘विनोद’ न करता तमाम कोकणवासीयांची माफी मागावी, त्यानंतर पुढे बोलावे, असे आव्हाड म्हटले.