ठाणे : महाराष्ट्रासह देशभरातील विविध शहरात २० गुन्हे करून गेल्या ५ वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या 'इराणी टोळी'तील अट्टल गुन्हेगाराला, कल्याण नजीकच्या आंबिवलीतील इराणी कबिल्यातून मानपाडा पोलीस ठाण्याच्या ( Manpada Police Station Thane ) विशेष पथकाने सापळा रचून त्याला अटक केली ( Irani Gang Criminal Arrested ) आहे. हसनैन गुलाम सैय्यद उर्फ इरानी (वय २८ वर्षे) असे बेड्या ठोकलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.
पळून जाण्याच्या तयारीत असतानाच गुन्हेगारावर झडप ..
जिल्हातील विविध शहरात दुचाकी चोऱ्यासह सोनसाखळी धूम स्टाईलने पळविण्याच्या घटना वाढल्या आहेत. मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झालेल्या दाखलेबाज गुन्हेगारांचा शोध मोहिमेसाठी कल्याण पोलीस परिमंडळ हद्दीतील आठही पोलीस ठाण्यात विशेष पोलीस पथकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विशेष पोलीस पथक गुन्हेगारांना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरु होते. त्याचवेळी २०१६ साली गुन्हा करून फरार असलेला इराणी टोळीतील गुन्हेगार हसनैन उर्फ इरानी हा आंबिवलीतील इराणी कबिल्यात फिरत असल्याची गुप्त माहिती मानपाडा पोलीस ठाण्याच्या विशेष पथकला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी इराणी कबिल्यातून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगाराला सापळा रचून अटक केली.
आतापर्यत ८ गुन्हे केल्याची कबुली ..
ठाणे जिल्ह्यातील ७ विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर कर्नाटक राज्यातील बंगळुरू शहरातील एका पोलीस ठाणाच्या हद्दीत चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरी व बतावणीचे गुन्हे केल्याचे सांगत ८ गुन्हे केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. या अट्टल गुन्हेगाराकडून कबूल केलेल्या ८ गुन्ह्यातील २ महागडे मोबाईल, २ दुचाकी आणि ३० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २, लाख ६१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
देशभरासह महाराष्ट्रात २० गुन्हे केल्याचे आले समोर..
अट्टल गुन्हेगार असलेल्या २८ वर्षीय इरानीने गेल्या ५ वर्षात देशभरासह महाराष्ट्रात २० गुन्हे केल्याचे समोर आले आहे. तर भिवंडीतील नारपोली ठाण्याच्या हद्दीत गुन्हा केला असता त्याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांनी दिली आहे.
तीन महिन्यात वाहन चोरीचे ५० गुन्हे उघडकीस ..
वाहन चोरीसह सोनसाखळी चोरीला आळा बसून चोरट्यांच्या शोध घेण्याकामी मानपाडा पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचे विशेष पथक गठीत करण्यात आले. या पथकाने गेल्या तीन महिन्यात वाहन चोरीसह विविध ५० गुन्हे उघडकीस आणले आहेत. विशेष म्हणजे उघडकीस आलेले हे ५० गुन्हे ठाणे, मुंबईतील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून आतापर्यत १३ आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपीकडून आतापर्यत २१ लाख ६४ हजार रुपये किंमतीच्या ४३ दुचाकी ,६ रिक्षा व २३ दुचाकीच्या इंजिनचे पार्ट हस्तगत करण्यात आले आहेत.