ठाणे - वाहतूक पोलिसांच्या वर्दीवर हात टाकल्याची खळबळजनक घटना कल्याणातील वाहतूक पोलिसांच्या एका कार्यलयात घडली आहे. मुजोर वाहनचालक हा दारूच्या नशेत असल्याने कारवाईसाठी त्याला वाहतूक विभागाच्या कार्यलयात आणले होते. दरम्यान या नशेबाजाने वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून त्यांना धक्कबुक्की केली. त्यानंतर त्याने वाहतूक कार्यलयातच अधिकारी – कर्मचाऱ्यासमोर धिंगाणा घातला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात मुजोर वाहनचालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. गोकुळ पदघन, असे अटक केलेल्या नशेबाज चालकाचे नाव आहे.
वाहतूक पोलीसांची कल्याण पाश्चिम परिसरात काल रात्रीच्या सुमारास ड्रिंक अॅन्ड ड्राइव्हची कारवाई सुरू होती. या कारवाई वेळी टेम्पो चालक गोकुळ हा दारूच्या नशेत धुंद असल्याने त्याला कारवाईसाठी वाहतूक पोलिसांनी रोखले. त्यांनतर कारवाईसाठी त्याचा लगतच्या वाहतूक कार्यालयात आणले. दरम्यान, या आरोपी टेम्पो चालकाने चक्क वाहतूक पोलीस कर्मचारी प्रकाश जाधव यांची कॉलर पकडत त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली.
मुजोर चालकाची धक्काबुक्की मोबाईल कॅमेऱ्यात कैद-
धक्काबुक्कीचा प्रकार पाहून इतर पोलिसांनी तत्काळ या मद्यधुंद चालकाला ताब्यात घेत कल्याण पश्चिम भागातील वाहतूक पोलीस कार्यालयात आणले. या कार्यलयात देखील त्याने धिंगाणा घालत वाहतूक पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली व पोलिसांच्या अंगावर धावून गेला. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात मद्यपी वाहनचालक गोकुळ पदघन विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तर आज दुपारच्या सुमारास त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा- पेट्रोल शंभरीपार : टिवटिव करणारे कलाकार गेले कुठे - नाना पटोले