ठाणे - देशात अनेक भागात सध्या एनआरसी, सीएए आणि एनपीआर या कायद्यांच्या विरोधात आंदोलन आणि मोर्चे निघत आहेत. हे मोर्चे शांततेने आणि गांधीजींच्या मार्गाने होत आहेत. हा लढा कोणत्याही जाती धर्माचा नसून सर्व जाती धर्माचे लोक या लढ्यात समाविष्ट आहेत, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... 'सीएए'मध्ये गैर काय, माझा देश म्हणजे धर्मशाळा नव्हे - राज ठाकरे
सीएए, एनआरसी आणि एनपीआर यांच्या विरोधात निघालेले मोर्चे हे कोणत्याही जाती धर्माचे नाहीत. लोक हातात संविधान घेऊन बाहेर पडत आहेत आणि संविधान वाचवण्याची मागणी करत आहेत. हे आंदोलन महात्मा गांधीजींचा आदर्श घेऊन सुरू आहे. हे आंदोलन कोणत्याही जातिधर्माचे नाही. तसेच हा लढा हिंदू-मुस्लिम असाही नाही. भारतीय संविधानाने मुक्त केलेल्या मनुस्मृतीविरोधातील हा लढा आहे. त्याचे आपणही समर्थक आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हाती घेऊन हा लढा होत आहे. कारण, संविधान वाचले तरच हा देश वाचेल, असेही आव्हाड यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांच्या 'दगडाला उत्तर दगडाने आणि तलवारीला उत्तर तलवारीने' या विधानाबाबात आव्हाड यांना विचारले असता त्यांनी, काही विधाने ही बोलणाऱ्यांपुरतीच मर्यादीत असतात. त्यांच्याविषयी आपण का बोलायचे ? असे म्हटले आहे.
हेही वाचा... राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे....