ठाणे - नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी संघर्ष कृती समितीच्या वतीने हजारोंच्या संख्येने सिडकोला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनादरम्यान संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाने सिडको प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. '१५ ऑगस्ट पर्यंत विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, नाही तर १६ ऑगस्ट नंतर आम्ही विमानतळाचे काम बंद करू. तसेच जोपर्यंत आमची मागणी पुर्ण होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरु राहील', असा इशारा संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिला आहे.
सभेत राजू पाटील यांची क्रेझ
आज घेराव आंदोलनानंतर नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालयाच्या समोर संघर्ष समितीची सभा झाली. यावेळी सर्वच पक्षाचे नेते भाषण करत होते. मात्र या सर्व भाषणादरम्यान मनसे नेते राजू पाटील यांची दमदार एन्ट्री झाली. त्यावेळी हजारो युवकांनी राजू पाटील यांच्या समर्थनार्थ 'एकाच वादा राजू दादा' या घोषणा दिल्या. एवढ्यावर जमाव थांबला नाही तर त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ही घोषणाबाजी झाली.
हेही वाचा - NaviMumbaiAirport : नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा प्रश्न 15 ऑगस्टपर्यंत निकाली काढावा - संजीव नाईक