ठाणे - प्रदूषण, जलपर्णी व नदी पात्राच्या स्वच्छतेसाठी गेल्या १८ दिवसांपासून 'मी कल्याणकर' संस्थेतर्फे वडवली पंप सेक्शन नजीकच्या उल्हास नदीपात्रात बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते. मात्र शनिवारी दुपारी नगरविकासमंत्री, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. नदीपात्र स्वच्छतेसाठी विविध घटकाची मदत घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन पालकमंत्री शिंदे यांनी दिले. तसेच आंदोलनकर्त्ये, माजी नगरसेवक नितीन निकम, माजी नगरसेवक कैलास शिंदे, माजी नगरसेवक उमेश बोरगांवकर यांची भेट घेत त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या विनंतीनंतर मागील १८ दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.
कल्याण डोंबिवली महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत वेगाने फोफावणारी जलपर्णी काढण्यासाठी अत्याधुनिक मशिनरीचा वापर करा, तोपर्यंत बोटीच्या मदतीने कामगारांकडून जलपर्णी काढण्याचे काम सुरु करा, तसेच घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे एसटीपी प्लांट कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढवा या सूचना संबधित पालिका प्रशासनाला देण्यात आल्या.
याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उल्हासनगर महापालिका आयुक्त ए. एन. राजा, जिल्हा परिषद सीईओ, परिमंडळ ३, पोलीस उप-आयुक्त विवेक पानसरे, तसेच सगुणा बागेचे प्रगतिशील शेतकरी व मायक्रोबायॉलॉजिस्ट शेखर भडसावळे, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार जगन्नाथ शिंदे, आमदार शांताराम मोरे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या ग्वाहीनंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.
सोमवारपासून मॅन्युअल पद्धतीने जलपर्णी काढण्यास सुरुवात-
भडसावळे यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने औरंगाबाद येथे ४० एकरवर पसरलेल्या डॉ. सलीम अली तलावातील जलपर्णी दोन वर्षांपूर्वी नष्ट करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षात तिथे ही समस्या पुन्हा उद्भवलेली नाही. याच तंत्रज्ञानाची मदत उल्हास नदीतील जलपर्णीची समस्या निकाली काढण्यासाठी घेण्यात येणार आहे. तसेच, तातडीची बाब म्हणून सोमवारपासून मॅन्युअल पद्धतीने जलपर्णी काढण्यास सुरुवात करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
नदीत वाहून येणारे सांडपाणी रोखण्यासाठी एसटीपीची उभारणी-
उल्हासनदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिका यांच्या माध्यमातून एसटीपी उभारले जात आहेत. खेमाणी येथील एसटीपीचे काम पूर्ण झाले असून कल्याण-डोंबिवली हद्दीतील ५ एसटीपीचे काम मे अखेरीपर्यंत पूर्ण होणार आहे. म्हारळ नाल्यावरही एसटीपी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच तातडीची बाब म्हणून या नाल्याच्या मुखाशी बांध घालून सांडपाणी थेट नदीत मिसळणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
हेही वाचा- भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका महाराष्ट्रात होणार; ठाकरे सरकारचा हिरवा कंदिल