ठाणे - नशेच्या आहारी गेलेला माणूस रागाच्या भरात काय करील याचा काहीच नेम नाही. अशीच एक घटना ठाण्यात घडली ज्याचा थरार cctv मध्ये कैद झाला आहे. ठाण्यात एका ग्राहकाने हॉटेल मालकावर रागाच्या भरात धारदार शस्त्राने वार केल्याची थरारक घटना घडली आहे.
हॉटेल मालकाशी हुज्जत घालून केले सपासप वार -
ठाण्यातील कॅसेल मिल परिसरात असलेल्या रुची चायनीज या हॉटेलमध्ये त्याच परिसरातील एक व्यक्ती जेवण्यासाठी गेली असता केवळ तेथील वेटरने बाहेर खाण्यासाठी प्लेट न दिल्याने हॉटेल मालकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच राग अनावर झाल्याने त्या व्यक्तीने आपल्या जवळील धारदार शस्त्राने हॉटेल मालकावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरलेल्या हॉटेल मालकाने आपल्या बचावासाठी आपले दोन्ही हात चेहऱ्यासमोर धरले ज्यामुळे त्यांच्या हातावर आणि डोक्यावर गंभीर प्रकारच्या जखमा झाल्या. ही हल्लेखोर व्यक्ती त्याच परिसरातील रहिवासी असून हल्ल्याच्या दिवसापासून तो बेपत्ता आहे. घडलेला संपूर्ण थरार cctv मध्ये कैद झाल्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.
हल्ला रोखण्यासाठी कोणी पुढे आले नाही -
हा हल्ला जेव्हा सुरू होता तेव्हा हॉटेलमध्ये अनेक ग्राहक होते. त्यांच्यासोबत हॉटेलचे कर्मचारी देखील होते. परंतु यावेळी मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. दरम्यान, हल्लेखोर पळूनही गेला. राबोडी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा - खळबळजनक : पत्नीचा मोबईल घेणे पडले महागात; पत्नीने कापले पतीचे ओठ