ठाणे - दुकान बंद करुन घरी परतणाऱ्या एका सेल्समनला चार जणांच्या अज्ञात टोळक्याने भरस्त्यात बेदम मारहाण करत 3 लाख 66 हजारांची रोकड लुटल्याची घटना समोर आली आहे.
रविवारी(दि.01 डिसेंबर)ला रात्री साडेदहाच्या सुमारास कल्याण (पूर्व) हनुमान नगर येथे संबंधित प्रकार घडला. याप्रकरणी जखमी सेल्समनने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामललित गुप्ता (वय -35) असे जखमी सेल्समनचे नाव आहे.
रामललित गुप्ता कल्याण (पूर्व), कामनानगर परिसरातील रहिवासी आहे. तो रविवारी रात्री दुकान बंद करुन दुकानातील 3 लाख 66 हजरांची रोकड घेऊन रिक्षाने परतत होता. यानंतर रिक्षातून उतरून हनुमान मंदिराजवळून चालत असताना अचानक चार अज्ञात लुटारूंनी त्याला हटकून बेदम मारहाण केली. यानंतर चोरट्यांनी रामललित जवळील 3 लाख 66 हजारांची रोकड लंपास केली. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत रामललित गुप्ताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर कल्याणच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपनिरीक्षक नलावडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.