भिवंडी(ठाणे)- कोरोनाच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या डॉक्टरांचे नागरिक कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे खासगी डॉक्टरांनी कोरोना व्यतिरिक्त इतर आजार जडलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास अथवा त्यांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यास नकार दिल्याच्या घटना भिवंडीत घडत आहेत. रुग्णांवर उपचार न करणाऱ्या खासगी डॉक्टरांच्या मनमानी कारभारामुळे अनेकांवर जीव गमविण्याची वेळ आल्याचा आरोप एमआयएम शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांनी केला आहे. गुड्डू यांनी रुग्णांवर उपचार न कारणाऱ्या खासगी डॉक्टरांवर कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांसह, पोलीस व पालिका प्रशासनाकडे केली आहे.
कोरोना संकटाच्या काळात कोरोना व्यतिरिक्त इतर आजार असलेल्या रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी उपचार करणे बंधनकारक आहे. याबाबतचे निर्देश सर्वोच्च न्यायालायसह देशाचे पंतप्रधान व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वच खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांसह रुग्णालय चालक मालकांना दिले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालासह केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशांकडे खासगी रुग्णालये व डॉक्टरांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भिवंडीतील रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.
कोरोना व्यतिरिक्त रुग्णांवर उपचार करण्यास व दाखल करण्यास खासगी रुग्णालये नकार देत असल्याने रुग्णांना रिक्षा व इतर वाहनांमधून रुग्णालयांच्या पायऱ्या झिजविण्यात वेळ जात असल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. खासगी रुग्णालयातील या भीषण परिस्थितीकडे एमआयएम शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांनी लक्ष वेधले आहे.कोरोना व्यतिरिक्त इतर आजार असलेल्या रुग्णांवर खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना उपचार करण्याचे सक्त निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.