पालघर/वाडा - जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीतील कंपनीत विषारी वायू गळतीने ३ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर, मृतदेहाची तपासणी करणाऱ्या तुंगा हॉस्पिटलमधील डॉक्टरांना देखील विषारी वायुबाधा झाली आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एस्क्वायर (esquire) केमिकल कंपनीमध्ये (प्लॉट क्र. एन ६०) रासायनिक प्रक्रिया करताना वायुगळती झाली. मृतांमध्ये कंपनी मॅनेजर प्रभाकर खडसे (५९), ऑपरेटर दत्ता घुले (२५) आणि कामगार रघुनाथ गोराई (५०) यांचा समावेश आहे. याप्रकरणी बोईसर पोलीस तपास करत आहे.
घटनेनंतर या कामगारांना औद्योगिक क्षेत्रातील तुंगा रुग्णालयात आणल्यानंतर संबंधित रासायनिक वायुचा रुग्णालयातील इतरांनाही त्रास जाणवू लागला. कामगारांच्या मृतदेहाची तपासणी करत असताना डॉक्टरांनाही चक्कर आल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दुर्घटनेनंतर ४-५ तास उलटूनही कंपनीच्या मालकाने कामगारांची विचारपूस न केल्याने रुग्णालयाबाहेर मृत कामगारांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. या ठिकाणी काही काळ पोलीस आणि मृतांचे नातेवाईक यांच्यात बाचाबाचीही झाली. बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीत अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार घडत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कामगारांना आपले जीव गमवावे लागतात. कंपनी मालकांवर कठोर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगत मृतांच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.