ठाणे - उल्हासनगरमधील २५ वर्षीय तरुणाला मोबालवरील जुगार गेमचा नाद लागला. या नादामुळे तो लाख रुपये हरवून बसल्याने त्याने चोरीचा मार्ग निवडला. त्यातच एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून धूमस्टाईल पळ काढला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विठ्ठलवाडी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे. राहुल मोहिते असे मंगळसूत्र चोरीप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
देवीची ओटी भरण्यासाठी जात असताना घडला प्रकार
प्रियंका महाडिक (वय ४७) या कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहतात. त्या बुधवारी मंदिरात देवीची ओटी भरण्यासाठी चिंचपाडा भागातील रस्त्याने जात होत्या. याचवेळी त्यांच्या मागावर असलेल्या चोरट्याने महाडिक यांच्या गळ्याला हिसका देत १ लाख ३५ हजारांचे मंगळसूत्र खेचून धूम ठोकली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या आधारे विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. त्याआधारे नांदिवली गावातून राहुल मोहिते याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मंगळसूत्र चोरीचा गुन्हा कबूल केला आहे.
आरोपीला २ दिवसांची पोलीस कोठडी
सध्याच्या युवा पिढीला मोबाइलवरील विविध जुगारासारखे गेम खेळून पैसे कमविण्याचा नाद लागला. मात्र या गेमच्या नादात अनेक तरुण लाखो रुपयांची रक्कम हरताना दिसून येत आहेत. हाच नाद आरोपी राहुलला लागला. व्हिडिओ व मोबाइल गेम खेळताना तो एक लाख रुपये हरला होता. त्यामुळे त्याने चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी राहुलला न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.