ठाणे - मनसुख हिरेन यांच्यावर ठाण्यातील वैकुंठ स्माशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी त्यांचा मृतदेह ठाण्यात सापडला होता. संशयास्पद मृत्यू झालेले मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही उकलले नाही. त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
हेही वाचा - हिरेन मृत्यू प्रकरणी गृहमंत्री आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्यात बैठक
दरम्यान, शवविच्छेदन रिपोर्ट आणि मृत्यूचे कारण स्पष्ट करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका हिरेन परिवाराने घेतली होती. कळवा हॉस्पिटलने शवविच्छेदन रिपोर्ट नौपाडा पोलीस, मुंब्रा पोलीस आणि पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांना सुपूर्द केला. तो रिपोर्ट घेऊन पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी हिरेन कुटुंबाची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. त्यानंतर हिरेन कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेत वैकुंठ स्माशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा - मनसुख यांचा शवविच्छेदन अहवाल कुटुंबीयांनी नाकारला; मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
राजकारण तापले
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर मात्र आता राजकीय वातावरण तापले असतानाच विरोधकांनी मात्र तपास एनआयएकडे द्यावा अशी मागणी लावून धरली आहे. दरम्यान, तपास एटीएस पथकाकडे दिल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. मात्र, वाढता दबाव आणि मागणीमुळे मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास हा एनआयएकडे देण्याची शक्यता बळावलेली आहे. मनसुख हिरेन संशयित मृत्यूप्रकरणी अनेक प्रश्न मृतदेह सापडल्यानंतरही संशयाच्या धुक्यातच आहेत.
हेही वाचा - 'उद्या मोदी नोटांवरील गांधीजींना हटवून स्वत:चाही फोटो लावतील'
एटीएस पथक घटनास्थळी दाखल
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तपास हा एटीएसकडे सोपविण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर शनिवारी सकाळीच एटीएस पथकाने मुंब्रा रेतीबंदर येथील घटनास्थळाला भेट दिली. एटीएसचे अधिकारी श्रीपाद काळे यांनी टीमसह घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. आसपासच्या लोकांशी संवाद साधला. घटनास्थळावर परिस्थितीजन्य पुरावे जमा करण्याचे प्राथमिक तपास करण्यात आला.
अंत्यसंस्कारासाठी अलोट गर्दी, पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त
मनसुख हिरेन यांच्या परिवारामागे ठाण्यातील व्यापारी संघटना आणि जैन धर्मियांची संघटना आहे. या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केली होती. तर हिरेन कुटुंबीयांनी मृत्यूचे कारण आणि शवविच्छेदनाचा रिपोर्ट शिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र, पोलिसांच्या आश्वासनावर अखेर हिरेन कुटुंबीयांनी मनसुख यांचा मृतदेह कळवा रुग्णालयातून संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतला. मनसुख हिरेन यांचा मृतदेह डॉ.आंबेडकर रोडवरील राहत्या घरी विकास पाल्म सोसायटीत आणला असता त्याचे नातेवाईक, दुकानातील कर्मचारी, मित्र परिवार आणि क्लासिक दुकानातील ग्राहक, व्यापारी संघटनेचे व्यापारी, जैन धर्मिय यांनी मोठी गर्दी केली होती. तर या गर्दीला आवरणे अवघड होईल याचे भान ठेवून ठाणे पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. अखेर ७ वाजण्याच्या आसपास अंत्यसंस्कार करण्यात आले.