ठाणे - पेस्ट कंट्रोलमुळे चार वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरात घडली. यामध्ये मुलीच्या आईची प्रकृती स्थिर आहे. मात्र पोटच्या मुलीचा मुत्यू झाल्यामुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.
दुर्लक्ष जिवघेणे ठरले-
फेब्रिकेशनचा व्यवसाय असलेले राजू पांडुरंग पालशेतकर हे पत्नी व चार वर्षांची मुलगी ऋत्वीसह कासारवडवली येथील डेफोडिल सोसायटीत राहत होते. त्यांच्या घरात शनिवारी 13 मार्चला पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. पेस्ट कंट्रोलचे काम दुपारी 3.30ला संपले. त्यानंतर पाच वाजता कुटुंब आपल्या घरात गेले होते. त्यावेळी पेस्ट कंट्रोलचा वास येतच होता. पेस्ट कंट्रोलनंतर या रसायनाचा वास येत असतानाही पालशेतकर कुटुंबांने त्याकडे दुर्लक्ष केले. हाच उग्र वास थोड्या वेळाने या कुटुंबासाठी घातक ठरला. या वासामुळे ऋत्वीला रात्री अडीचच्या सुमारास उल्टी झाली. पत्नीलाही मळमळ जाणवू लागली. पेस्ट कंट्रोलच्या वासामुळे हा त्रास होत असल्याचे गृहित धरून या दोघांना थोड्या वेळाने बरे वाटेल, असे पालशेतकरांचे मत झाले.
पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा-
पण, सकाळनंतर पुन्हा या दोघींना त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पत्नी व मुलीला घोडबंदर येथील नोबल रुग्णालयात 14 मार्चला पालशेतकरांनी दाखल केले. उपचार सुरू झाल्यानंतर पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा झाली. सायंकाळपर्यंत मुलीच्या प्रकृतीत फारसा फरक पडला नाही. अखेर सायंकाळी सहाच्या सुमारास या चिमुरडीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
हेही वाचा- राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर; केंद्र सरकारचे राज्याला पत्र