ठाणे : कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रात 14 एप्रिलला कोरोना बाधित एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आज मात्र डोंबिवली पूर्वेतील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयातील 2 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने कल्याण - डोंबीवलीतील रुग्णांची संख्या 58 वर पोहोचली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज आढळून आलेले दोन्ही रुग्ण डोंबिवली पूर्वेकडील आहे. यामध्ये डोंबिवली पूर्वेतील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयाच्या 30 वर्षीय कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तर दुसरा रुग्ण 42 वर्षीय महिला असून ही महिला याच खासगी रुग्णालयाची कर्मचारी आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने रुग्ण आढळून आलेले खासगी रुग्णालय सील करण्यात आले आहे. तसेच हे दोन्ही कर्मचारी राहत असलेला परिसरही सील करण्यात आला आहे.
खळबळजनक बाब म्हणजे कल्याण - डोंबिवलीत रुग्णांच्या संख्येत भर पडून ही संख्या 58 वर पोहोचली आहे. यापैकी केवळ डोंबिवलीतच 38 रुग्ण आढळून आले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 39 असून आतापर्यत 17 जण बरे झाल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विगतवारी पाहता डोंबिवली पूर्वेकडील 30 रुग्ण तर डोंबिवली पश्चिमेला 8 रुग्ण, कल्याण पूर्वेत 13 तर कल्याण पश्चिमेला 7 रुग्ण तसेच टिटवाळा आणि मोहने गावात प्रत्येकी एक रुग्ण असे 58 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत.