ठाणे : कोरोनाच्या पाश्वभूमीवर सुरु केलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका राज्यासह देशातील सर्वच आदिवासी बांधवांना बसला आहे. मात्र, पावसामुळे आदिवासी बांधवांना रानभाज्यांचा मोठा आधार मिळत आहे. या भाज्या खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत असल्याने कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांचे महत्त्व अधोरेखित होत आहे. विशेष म्हणजे मान्सूनपूर्व पावसामुळे रानभाज्यांच्या वाढीला पोषक वातावरण तयार झाले असून या भाज्यांची बाजारातील आवक वाढली आहे. नागरिकही या भाज्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसत असून स्थानिक आदिवासी महिलांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.
भिवंडी तालुक्यातील अलकोळी गावातील आदिवासी बांधवांवरचे लॉकडाऊनमुळे होत असलेल्या उपासमारीचे संकट दूर होत असून गावातील आदिवासी कुटूंब टोपली, पहार, विळा घेऊन रानभाज्या आणण्यासाठी नजिकच्या जंगलात जात आहेत.
हेही वाचा... तामिळनाडूचे हुतात्मा जवान के. पलानी यांच्या पार्थिवावर झाले अंत्यसंस्कार
आदिवासी महिलांसह सहबांधव खोदकाम करून जमिनीतील कंद काढताना दिसत आहे. तसेच कोलभाजी, बाफनी, शेवळे, गिडवाड, धिंड, तेलपाट, फोईफूड, केळबोड, हाळीव, कोशमा, हाळीदसह विविध रान भाज्या मोठ्या प्रमाणात गोळा करता. त्यानंतर या भाज्य शहरी भागात तर काही वेळा महामार्गाच्या बाजूला त्या रानभाज्यांची, कंदमुळाची विक्री करून घरात लागणारे तेल, मीठ, मसाला आदी चीजवस्तू खरेदी करत आहेत.
मानवी शरीरासाठी लागणाऱ्या प्रोटीनयुक्त आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या रान भाज्यांची शहरात मोठी मागणी असते. या रानभाज्या पावसाळा सुरु झाल्यावर केवळ जंगलात मिळतात. यावर आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा उदाहरनिर्वाह करण्यासाठी आदिवासी बांधवांना मोठी मेहनत करावी लागत आहे. या रानभाज्यांमध्ये लोह, खनिज, प्रथिने आदी पोषक गुणधर्म असल्याने आहारात त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
हेही वाचा... बांधावर बियाणे पोहोचलेच नाही, दुकानातही तुटवडा; पाऊस पडूनही आम्ही पेरावं की नाही?
निसर्ग चक्रीवादळापासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने कमी-अधिक स्वरूपात हजेरी लावली. त्यानंतर येथील जंगल, शिवार आणि मोकळ्या जागांवर विविध प्रकारच्या रानभाज्यांसाठी पोषक वातावरण तयार झाले. स्थानिक पातळीवर उगवणाऱ्या विविध प्रकारच्या या रानभाज्यांचा आकार रंग, फुले इत्यादींमुळे त्या वेल, शेंग आणि फळवर्गीय तसेच कंदमुळे या प्रकारानुसार ओळखण्यात स्थानिकांचा हातखंडा आहे. एवढेच नव्हे तर त्यामध्ये औषधी गुणधर्मामुळे, त्या कोणत्या आजारांवर रामबाण उपाय ठरू शकतात याचीही त्यांना माहिती आहे. या त्यांच्या ज्ञानाला आहारतज्ज्ञांकडूनही दुजोरा मिळाला असून ठराविक हंगामात जरी त्यांचे सेवन केले तरी त्यामुळे निर्माण होणारी प्रतिकारशक्ती अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरते.
ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरून आलेल्या महिला शहरात रानभाज्या विकतात. त्याद्वारे त्यांना रोजगार, तर नागरिकांना पौष्टिक आहार मिळत आहे. हातावर पोट असलेल्या या आदिवासी बांधवांना आजही पोटाची खळगी भरण्यासाठी दोन किलोमीटर असलेल्या जंगलात पायपीट करून रानभाज्या आणण्यासाठी जावे लागते.
हेही वाचा... ओडिशातील जगन्नाथ पुरी येथील वार्षिक रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
आदिवासी बांधवांनी या रानभाज्या मोठ्या मेहनतीने आणल्यानंतर पुन्हा त्या विकण्यासाठी पाच ते सहा किलोमीटर पुन्हा पायपीट करून महामार्गावर जावे लागते. ठाणे जिल्ह्यतील ग्रामीण परिसरात राहणाऱ्या आदिवासी बांधव अशा परिस्थितीत दिवस काढत आहेत तर लांब असलेल्या गावांची काय स्थिती असेल, यासाठी शासनाने लक्ष देणे आणि रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत आदिवासी बांधवानी व्यक्त केले.