ठाणे - जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पडत असलेल्या पावसाने नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात चार जण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. त्यापैकी दोघांचे मृतदेह मिळाले असून दोन अजूनही बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू आहे. मृतांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. भगवान भगत (रा.कोठारे ), बाभळी वाघ (रा. शिलोत्तर ), तुकाराम मुकणे (रा. टेंभरे), विमल सराई (रा. पिवळी खोर) असे ओढ्याच्या प्रवाहमध्ये वाहून गेलेल्यांची नावे आहेत.
चौघे गेले वाहून - गेल्या पाच दिवसांपासून शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी नाल्यांना पूर आले आहे. या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने काल (सोमवार) सायंकाळच्या सुमारास पुराच्या पाण्यात ४ जण वाहून गेले आहेत. चार पैकी एक महिला बाजारात समान खरेदी करून घरी जाताना रस्त्यावर पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे ती पाण्याच्या प्रवाहमधून वाट काढत घरी जाताना ती वाहून गेली. तर तीन शेतकरी शेतातून घरी जाताना रस्त्यावर आलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले. दोघांचे मृतदेह नदी पत्रातून काढण्यात बचावपथकाला यश आले आहे. मात्र दोघे अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अनेक जिल्ह्यात अलर्ट - कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी १४ जुलैपर्यंत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसाठी पुढील ३ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील आठवड्यापासून राज्यभरात विविध ठिकाणी मुसळधार ( Maharashtra Heavy Rain ) तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. येणारे काही दिवस राज्यभर अश्याच पद्धतीने पाऊस राहणार आहे. तर राज्यातील पालघर,रायगड, कोकण आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तसेच विदर्भातील अनेक जिल्हयात पुढील तीन दिवस रेड अलर्ट ( Pune On Red Alert ) देण्यात आला आहे. तर कोल्हापूर येथे देखील अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडुन ( Meteorological Department ) देण्यात आला आहे.