ठाणे- शहरात मागील चार दिवसांपासून पडणाऱ्या धो-धो पावसाने रविवारी रात्री पासून विश्रांती घेतली आहे. मात्र, अनधिकृत बेकायदेशीर आणि नियोजन शून्य बांधकामामुळे अजूनही अनेक ठिकाणी पाणी ओसरलेले नाही. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
ठाणे मनपा हद्दीतील कळवा येथील पारसिक नगर मधील श्री जी धाम आणि श्री जी सोसायटीमध्ये गेल्या ४-५ दिवसांपासून पावसाचे पाणीच ओसरलेले नाही. कारण या सोसायटी मधील पाण्याचा निचरा होणाऱ्या पाईप लाईन जवळच असलेल्या नॅशनल हायवे डागडुजीमध्ये चोकअप झाल्या आहेत. यामुळे या सोसायट्यांमध्ये २ ते ३ फूट पावसाचे पाणी साचून आहे. जर सोमवारी संध्याकाळपर्यंत हे पाणी काढले गेले नाही तर ज्या नॅशनल हायवेमुळे हे पाणी तुंबले आहे, तो नॅशनल हायवे मी खोदून टाकेन, असा इशारा स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
त्यात सोमवारी चार जुलै रोजी पडलेल्या पावसाने नाल्याचे घाण पाणी देखील या सोसायटीच्या आवारात आले आहे. या पाण्यातून येथील रहिवाशांना ये-जा करावे लागत असल्याने येथील रहिवाशांना लेप्टोस्पायरेसिस तसेच साथीचे आजार होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. ठाणे मनपाने याठिकाणी छोट्या बोटींची व्यवस्था केली आहे. मात्र, आता येथे रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी या प्रकाराला पालिका प्रशासनाला जवाबदार धरत त्यांनी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पालिकेच्या प्रशासनाने आणखी हलगर्जीपणा केल्यास याभागात मोठी रोग राई पसरू शकते आणि नागरिकांमध्ये याची मोठी दहशद पसरली आहे.