ठाणे - भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात असलेल्या अंसारी मॅरेज हॉलमध्ये लग्न सोहळा सुरु असतानाच भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत लग्न मंडपासह मंडपा लगत असलेली २० ते २५ दुचाकी वाहने जळून खाक झाली आहेत.
फटाक्यांची ठिणगी उडून लग्न मंडपाला आग -
भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात असलेल्या अंसारी मॅरेज हॉलमध्ये आज रात्रीच्या सुमारास एक लग्नसमारंभ सुरु होता. यादरम्यान वाहन पार्किंगच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत होती. त्यातच आतिषबाजी सुरु असतानाच फटाक्यांची ठिणगी उडून लग्न मंडपाला आग लागली. त्यानंतर हळूहळू ही आग पसरत गेली. या आगीमुळे मंडपालगत असलेल्या पार्किंग ठिकाणी असलेल्या सुमारे २० ते २५ दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या दीड दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असून स्थानिक पोलीस ठाण्यात या आगीची नोंद करण्यात आली आहे.
परवानग्या न घेताच मॅरेज हॉल थाटले -
भिवंडी शहरात बहुतांश मोकळ्या जागेत अनेक व्यावसायिकांनी अशा प्रकारे संबंधित विभागाच्या परवानग्या न घेताच मॅरेज हॉल थाटले आहेत. मात्र, सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने भविष्यात जीवितहानी होण्याची मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून भिवंडी मनपा प्रशासन त्याकडे लक्ष देणार, का असा सवाल उपस्थित होत आहे.
हेही वाचा - Kisan Mahapanchayat : मोदींवर भरवसा नाही.. MSP कायदा मंजूर केल्याशिवाय शेतकरी आंदोलन मागे नाही - टिकैत