ठाणे - भिवंडी शहरातील पारनाका परिसरात असलेल्या बाजार पेठेमधील एका इमारतीच्या तळमजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत इमारतीमधील लेडीज टेलर, साड्या, महिलांच्या कपड्यांची अशी चार दुकाने जळून खाक झाली आहे.
इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण -
भिवंडी शहरात आगीचे सत्र सुरूच असून आज सकाळच्या सुमारास पारनाका भागातील बाजारपेठेत असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका दुकानात आग लागली होती. मात्र, सकाळच्या सुमारास इतर दुकाने बंद असल्याने ही आग त्या इतरही दुकानांपर्यत पसरून आगीच्या भक्षस्थानी चार दुकाने पडली. दुसरीकडे या भीषण आगीमुळे इमरतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
शॉटसर्किटने आग लागल्याचा अंदाज -
या घटनेची माहिती अग्निशामक विभागाला मिळताच, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एका तासात आग आटोक्यात आणली आहे. या आगीत दुकानदारांचे मोठे नुकसान झाले असून ही आग शॉटसर्किटने लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.