ठाणे - जमिनीच्या वादातून हाणामारी करणाऱ्या भाजप नगरसेवकाचा पोलीस ठाण्यात बचाव करण्यासाठी गेलेल्या भाजपच्या आमदारांसह बांधकाम विकासक असलेल्या नगरसेवकाविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. गणपत गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या भाजप आमदारांचे नाव आहे. तर मनोज राय असे मारहाणीचा गुन्हा झालेल्या बांधकाम व्यावसायिक भाजप नगरसेवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्वेतील भाजप नगरसेवक राय हे व्यवयासाने बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांचा एका जमिनीच्या वादातून जमीन मालकाशी वाद सुरू आहे. अचानक या जमिनीच्या वादाचे रूपांतर काल दुपारच्या सुमारास जोरदार हाणामारीत झाले. त्यानंतर नगरसेवक राय हे आपल्या कार्यकत्यांसह कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल नसताना व त्यांची तक्रार न घेताच थेट त्यांच्या दोन मुलांसह लॉकअपमध्ये टाकल्याचा आरोप नगरसेवकाने केला होता. त्यानंतर हा प्रकार कळताच भाजप आमदार गायकवाड हे पोलीस ठाण्यात पोहचताच त्यांनी पोलीस ठाण्यात पोलिसांसोबत हमरीतुमरी करीत राडा घातला. या राड्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
विशेष म्हणजे भाजप आमदार गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शाहूराज साळवे यांना आरेतुरेमध्ये एकेरी बोलत चांगलेच सुनावल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. मात्र, आमदारांचे उग्र रूप पाहता त्यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी साळवे यांनी मौन धारण करीत ‘हो ला हो’ उत्तर दिले. तरी देखील आमदार गायकवाड यांचा राग काही शांत नव्हता. हा राडा १५ ते २० मिनिटे सुरूच होता. त्यांनतर आमदार पोलीस ठाण्यातून निघून गेले. या प्रकरणी भाजप नगरसेवक मनोज राय आणि आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
नगरसेवक राय यांच्या विरोधात गजानन म्हात्रे यांच्यासह त्यांच्या साथीदारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तर राय यांच्या तक्रारीवरून गजानन म्हात्रेसह अन्य जणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात येऊन गर्दी जमविली. तसेच मास्कही घातला नव्हता. कोविड काळात गर्दी जमविल्या प्रकरणी पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात आमदार गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मी एकटाच त्याठिकाणी जाब विचारण्यासाठी गेलो होतो. एखाद्या प्रकरणी जाब विचारणे चुकीचे असेल तर माझ्या विरोधात जो गुन्हा दाखल झाला आहे. त्याविरोधात न्यायालयात दाद मागणार. ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. ते पोलीस ठाण्यात बसतात. तक्रार करणाऱ्या लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांनाच लॉकअपमध्ये टाकले जाते. हा कुठला न्याय असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज साळवे यांनी सांगितले की, नगरसेवक राय व त्यांच्या विरोधात जमिनीच्या वादातून हाणामारी झाली. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. हे कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे चुकीचे आरोप करणाऱ्या आमदारांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.