नवी मुंबई - नेरूळमधील बाप-लेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात असतानाच वाशी, कोपरी गावात देखील पाच दिवसांत बाप-लेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सहा महिन्यांपूर्वीच बापाने आपली किडनी देऊन मुलाचे प्राण वाचवले होते. मात्र, कोरोनापुढे दोघेही जीवनाची लढाई हरले.
नवी मुंबईत कोरोना रुग्ण वाढत आहेत आणि बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. मात्र, यात आधीच विविध विकारांनी आजारी असलेले रुग्ण दगावण्याच्या घटना जास्त घडत आहेत. नेरूळमध्ये पाच दिवसांपूर्वी एका २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता आणि त्याच्या ५५ वर्षीय वडिलांचे देखील शुक्रवारी कोरोनाने निधन झाले. या निधनाची चर्चा संपूर्ण नवी मुंबईभर सुरू असताना कोपरी गावात देखील हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. मागील आठवड्यात कोपरी गावातील एका ६५ वर्षीय व्यक्तीला ताप आला होता, त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले. त्यांनतर त्यांच्या ३३ वर्षीय मुलाची देखील चाचणी करण्यात आली होती. मात्र, मुलास घरी थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, २४ मे रोजी ६५ वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला तर मुलाचाही शुक्रवारी (२९ मे) कोरोनामुळेच मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो विवाहित असून त्याच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी आहे.
सहा महिन्यांपूर्वी परशुरामला वडील सुखदेव यांनी स्वतःची किडनी दान करून त्याचे प्राण वाचवले होते. तेव्हा त्यांना शस्त्रक्रियेसाठी स्थानिकांनी आर्थिक मदत केली होती. मात्र, कोरोनापुढे हे दोघेही बापलेक हरले. त्यामुळे अवघ्या पाच दिवसातच कोरोनामुळे बाप-लेकाचा मृत्यू होण्याच्या दोन घटना नवी मुंबईत घडल्याने सर्वत्र भीतीचे वातवरण पसरले आहे.