ठाणे - प्रत्येक सणाला पोलीस आपले कर्तव्य करत रस्त्यावर दक्ष असतात म्हणून आपण आनंदाने आणि सुखाने दिवाळी साजरी करू शकतो, वाहतूक पोलिसांच्या याच कर्तव्यभावनेची जाण राखून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहर वाहतूक पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली.
अहोरात्र काम करणारे पोलिस
वाहतूक पोलीस दिवसरात्र शहरातील वाहतुकीची व्यवस्था पाहण्यासाठी काम करतात. दिवाळीसह प्रत्येक सणाला आपल्या कुटूंबापासून दूर राहून कर्तव्य बजावतात. त्यामुळे पाडव्याच्या निमित्ताने आज आल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले. प्रत्येक सणाला पोलीस दक्ष राहून काम करतात कोरोना काळात देखील कर्तव्य निभावतात. अनेक पोलिसांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन काम करतात. अनेकदा ऊन पाऊस याची तमा न बाळगता ते रस्त्यावर उभे असतात. तसेच अनेकदा यंत्रणा उशिरा पोहोचतात. तेव्हा स्वतः ताप्तुरते रस्ते दुरुस्त करून वाहतूक नीट करण्याचे काम करतात. त्यांच्या कर्तव्यनिष्ठतेची जाण ठेवून पाडवा पोलीस बांधवांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले.
वाहतूक कर्मचाऱ्यांसोबत फोडले फटाके
पालकमंत्री शिंदे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फराळ देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तर पोलीस कर्मचाऱ्यांच्यासोबत बसून फराळ घेतला. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्या सोबत फटाकेही फोडले. यावेळी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग, वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, ठाणे वाहतूक पोलिसांचे ब्रँड अंबेसिडर अभिनेते मंगेश देसाई, नगरसेवक राजेश मोरे, संजय मोरे हे देखील उपस्थित होते.
हेही वाचा - आर्यन खानची जामीन मिळाल्यानंतर प्रथमच एनसीबी कार्यालयात चौकशी