ठाणे - मे महिन्यापासून ठाणे महानगरपालिका नालेसफाईवरून चर्चेत आहे. कारण पावसाळा तोंडावर आला असतानाही नालेसफाई पूर्ण झाली नाही. मात्र, नालेसफाईचे काम पूर्ण झाले नसतानाही महापालिका आयुक्त मात्र नालेसफाई 90 टक्के पूर्ण झाल्याचे बिनधास्त सांगत आहेत. येत्या काही दिवसातच पावसाला सुरुवात होईल. पण, नालेसफाई पूर्ण नाही झाली तर नागरिकांना मोठ्या नुकसानाला समोरे जावे लागणार आहे. अनेक ठिकाणी नाले भरल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये 4 ते 5 फूट पाणी जाते यामुळे नालेसफाई करणे अत्यंत महत्त्वाचे असतनाही महापालिका प्रशासन दिरंगाई करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
अनेक ठिकाणी जे नाले आधीपासून स्वच्छ आहेत त्या ठिकाणीच महापालिका आयुक्तांना ठेकेदार घेऊन जातात आणि आयुक्तांची दिशाभूल करतात. नालेसफाईमध्ये जेसीबी सारखे वाहन न वापरता पाण्याच्या टँकरने फवारणी करून शक्य होईल तेवढीच घाण काढली जाते. त्यामुळे ठेकेदार आयुक्तांना फसवत आहेत. एकीकडे आयुक्त 90 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगतात तर दुसरीकडे नाल्यांची स्तिथी जैसे थे आहे, असे आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केले आहेत.
पावसाळ्यात होणाऱ्या आपत्तींना महापालिका प्रशासन जवाबदार राहणार का, असा प्रश्नही नागरिकांना भेडसावत आहे. त्यामुळे पावसाला सुरुवात होण्यापूर्वी ठाणे महापालिका प्रशासन कशाप्रकारे नाले सफाई करणार हेही पाहून महत्त्वाचे आहे.
ठेकेदारांच्या कामचोरीसाठी युक्त्या
- पाण्याचा फवारा मारून कचरा पुढे ढकलणे जेणेकरून कमी खर्चात काम झाल्याचे दाखवता येते.
- आपल्या नाल्यातील कचरा दुसऱ्याच्या नाल्यात टाकणे.
- गाळ न काढता वरवरचा कचरा काढणे.
- पावसाच्या पाण्याची वाट पाहणे.
नालेसफाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदाराला दहा नोटिसा - उथळसर प्रभाग समिती अंतर्गत येत असलेल्या नाल्याच्या सफाईला गती येत नसल्याने अखेर संबंधित ठेकेदाराला पालिका प्रशासनाने 10 नोटिसा बजावल्या आहेत.
तेच ते ठेकेदार - दरवर्षी नालेसफाई करण्यासाठी ठेकेदार हे जुनेच असतात. त्यांना कामचोरीचा जवाळपास अभ्यास झालेला असतो. तरीही जुन्या ठेकेदारांना काम मिळते. यात ठेकेदार आणि प्रशासन यांचे लागेबांध असल्याचे विरोधक सांगत आहेत.