ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. या भागात असलेली 27 गावात तर बारमाही पाणी टंचाईने ग्रामस्थ मेटाकुटीस आले आहेत. या रोषाचा आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्रेक होताना दिसत आहे. प्रशासनाच्या विरोधात काही सोसायटीमधील नागरिक एकत्र येत त्यांनी पाणी न दिल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे.
हेही वाचा... ...म्हणूनच आदित्य ठाकरेंनी निवडला वरळी मतदारसंघ?
डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा येथील भद्रानगर कॉम्प्लेक्स हौसिंग सोसायटीने 'आधी पाणी द्या, मगच मत मागायला या' असा इशारा देणारा फलकच इमारतीच्या प्रवेशद्वारावर लावला आहे. या इमारतीत १२५ कुटुंबे राहतात. मात्र १६ वर्षांपासून येथे पालिकेचे पाणी इमारतीत येत नाही. मात्र पालिका प्राशासन पाण्याची बिले मात्र वसूल करत आहे. या सोसायटीचा महिन्याला टँकरवर ५० हजार रुपये खर्च होतो. प्रत्येक निवडणुकीत मुबलक पाणी मिळेल, असे पोकळ आश्वासन देवून उमेदवार मते मिळवतात. आता मात्र विधानसभा निवडणुकीत मतदारानांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधी पाणी प्रश्न सोडवा मगच मत मागायला या, असे उमेदवारांना बजावले आहे. या विरोधाचे फलक सध्या कल्याण डोंबिवलीत चर्चेचा विषय ठरत आहेत.
हेही वाचा... शिवसैनिक म्हणतात बालेकिल्ला आमचाच; कल्याणात शिवसैनिकांची भाजप विरोधात डरकाळी