ठाणे - मध्य रेल्वेच्या कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनलॉक काळात विविध गुन्हांमध्ये वाढ झाल्याचे नोंदीवरून समोर आले आहे. मात्र, लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे बहुतांश गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची उकल करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे हत्या, दरोडा, बलात्कार या सारख्या गंभीर गुन्ह्याचा तपास करून मुद्देमालासह गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मार्च 2020 साली देशभरात केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे रेल्वे वाहतूकही बंद होती. मात्र, 3 महिन्यानंतर रेल्वे प्रशासनाने केवळ विशेष ट्रेन सुरु केल्या होत्या. तर 7 महिन्यानंतर लोकल सेवा सुरु केली होती. त्यातच जानेवारी 2021 ते सप्टेंबर पर्यत कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याची हद्दीत असलेल्या कल्याण - कसारा आणि कल्याण बदलापूर रेल्वे स्थानकाच्या मार्गासह स्थानकात 581 गुन्हे घडल्याची नोंद समोर आली आहे. यामधील 227 गुन्हांची उकल करून आरोपींना अटक करण्यात कल्याण लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे.
लॉकडाऊनपूर्वी गुन्हांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
लॉकडाऊनपूर्वी म्हणजे 2018 साली तब्बल 3 हजार 500 गुन्हे घडले आहेत. तर 2019 साली 3 हजार विविध गुन्हे घडल्याची नोंद कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. एकंदरीतच लॉकडाऊनपूर्वी रेल्वेच्या हद्दीत विविध गुन्हांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, त्या दोन वर्षाच्या तुलनेत अनलॉक काळात म्हणजे 2021 मध्ये गुन्ह्याचे प्रमाण केवळ 20 टक्के असल्याचे दिसून आले आहे. यामध्येही गंभीर गुन्हेपैकी हत्या, बलात्कार, अपहरण, दरोडा, हे गुन्हे तपास करून म्हणजे 100 टक्के गुन्हांचा शोध पोलिसांनी लावून सर्व आरोपीना अटक केली.
फटका गँगच्या स्पॉटवर पोलिसांची पाळत -
धावत्या लोकल व ट्रेनमधील दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर काठीने अथवा हाताने फटका मारून मोबाईल पळविणाऱ्यांची टोळी लॉकडाऊनपूर्वी सक्रिय होती. मध्य रेल्वेच्या कल्याण-कर्जत आणि कल्याण-कसारा मार्गवार जवळपास फटका गँगचे 27 स्पॉट होते. मात्र, या सर्व स्पॉटवर पोलिसांनी पाळत ठेवून अनेक मोबाईल लंपासचे गुन्हे उघडकीस आणले आहे. मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते जूनपर्यंत 2021 या सहा महिन्याच्या कालावधीत फटका गॅंगविरोधात 8 गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या अडीच वर्षात मध्य रेल्वे मार्गावर फटका गँगविरोधात तब्बल 597 गुन्हे नोंदवण्यात आल्याने रेल्वे प्रशासनाच्या नाकीनऊ आले होते. मात्र, रेल्वेने केलेल्या जलद कारवाईनंतर गेल्या चार महिन्यात मध्य रेल्वे मार्गावर फटका गँगच्या कारवाईला आळा घालण्यात पोलिसांना यश आले आहे.
फटका गँग प्रवाशांना करत होते सावज -
एखादी ट्रेन अथवा लोकल रेल्वे सिग्नलवर उभी असेल अथवा प्लॅटफॉर्मवरून लोकल नुकतीच रवाना झाली असेल, तेव्हा दारावर मोबाईलवर बोलणाऱ्यांच्या हाताला फटका मारून ही गँग मोबाईल लांबवत होती. अनेकवेळा काठीने देखील मोबाईल हातात असणाऱ्या हाताला फटका गँगवाले फटका मारत होते. कल्याण रेल्वे पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. मात्र, कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या गँगचे अनेक गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडील मोबाईलही जप्त केले आहे.
लॉकडाऊनमुळे चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ -
देशभरात लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या जाऊन बेरोजगार झाले. तर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काही कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले. त्यामुळेच रेल्वेच्या हद्दीतही विविध गुन्ह्यांचे प्रमाणात वाढल्याची कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिकी शार्दुल यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना माहिती दिली. चालू वर्षांत चोऱ्यांच्या 503 घटना घडल्या. यापैकी 161 गुन्हे उघडकीस आणले. तर त्या खालोखाल पाकीटमारीचे 230 गुन्ह्यांपैकी 81 गुन्ह्याची उकल करून आरोपीना अटक केली. तर प्रवाशांच्या बॅगा हिसकावून पळविण्याचे गुन्हे 85 घडले यापैकी 25 गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल जप्त केला. शिवाय किरकोळ चोऱ्यांचे 185 गुन्ह्यांपैकी 54 गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले असून यामध्ये मोबाईल चोरीचे अनेक घटना आहेत. शिवाय 1 हत्या, 2 बलात्कार, 2 अपहरण, 1 जबरी दरोडा हे गुन्हे उघडकीस आणले. तसेच धावत्या ट्रेन- लोकलमध्ये चार विनयभंगाच्या गुन्हांपैकी 3 गुन्ह्यांची उकल करून आरोपीना अटक केली आहे. तसेच प्रवाशांना लुबाडून लुटमारीचे 7 गुन्ह्यांपैकी 6 गुन्हे तपास करून आरोपीना मुद्देमालासह अटक केली आहे.
हेही वाचा - बॉलिवूड सुपरस्टार कतरीना कैफला ‘पैठणी’ देऊन गौरविले ‘भाओजी’ आदेश बांदेकर यांनी!