ठाणे- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने महिलेला तीन डोस दिल्याचे उदाहरण ताजेच आहे. त्यानंतर आता चक्क 55 वर्षीय व्यक्तीला जिवंतपणी मृत घोषित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
ठाण्यातील मानपाडा येथे राहणाऱ्या चंद्रशेखर देसाई यांना औगस्ट 2020 रोजी कोरोनाची लागण झाली होती, दरम्यानच्या काळात होम क्वारंटाईन राहून घरीच उपचार घेत देसाई यांनी कोरोनावर मात केली. मात्र, पेशाने शिक्षक असलेल्या देसाई यांना मंगळवारी अचानक ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागातून एका महिलेचा फोन आला. त्यानंतर देसाई यांच्याकडे घरच्या पत्त्याची विचारपूस करण्यात आली आणि चंद्रशेखर देसाई यांचा मृत्यू कधी झाला? आम्हाला मृत्यूची नोंद करून मृत्यूचा दाखला तयार करण्यासाठी माहिती हवी असल्याची विचारणा करण्यात आली.
महापालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यारी महिलेचे हे वाक्य ऐकून देसाई यांच्या पाया खालची वाळू सरकली. त्यांनी फोनवर संवाद साधत असताना समोरील कर्मचारी महिलेस मी जिवंत असल्याची स्पष्ट केले. त्यानंतर महापालिकेचा हा भोंगळ कारभार पाहून चंद्रशेखर देसाई यांनी त्वरित महापालिकेत धाव घेतली आणि आरोग्य विभागाकडे तक्रार केली. 'मी जिवंत असून मला मृत घोषित केल्याचा
धक्कादायक प्रकार माझ्यासोबत घडला असल्याचे त्यांनी सांगितले'.
माझ्या कुटुंबीयांनाही माहिती मिळाली असती तर?
महापालिकेतील आरोग्य विभागात पोहोचल्यावर देसाई यांनी घडलेल्या धक्कादायक प्रकाराची शहानिशा करून घेतली आणि पालिकेच्या या कारभारावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, हा फोन मला आला. मात्र हाच फोन जर माझ्या कुटुंबीयांपैकी कोणाला केला असता, तर अनर्थ झाला असता. त्यामुळे ठाणे महापालिकेने निदान नोंदणी व्यवस्थित करावी, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.
पालिकेचे हात झटकले; केंद्र सरकारच्या यंत्रणेकडे बोट-
देसाई यांच्या मृत्यू बाबत विचारणा करण्यात आलेली माहितीवर ठाणे महापालिकेने उत्तर देताना म्हटले आहे की, यात महापालिकेच्या आरोग्य विभागाची काही चूक नाही, ही सर्व माहिती केंद्र सरकारकडे आहे. त्यांना पुणे येथील यंत्रणेकडून ही माहिती देण्यात आली. या बाबाबत आम्हाला काहीही अधिकार नसल्याचेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र हे उत्तर म्हणजे आपली चूक दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला. मी मागील वर्षी कोरोना बाधित झालो होतो मला कुठेही अॅडमिट केले नव्हते, अशा वेळी मला का मृत घोषित केले? हा प्रश्न पडला असल्याचेही देसाई म्हणाले.