ठाणे - ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येलाच आदिवासींच्या हक्काच्या खावटीमधून खाद्यतेल आणि मसाला हडपण्याचा संतापजनक प्रकाराचा पर्दाफाश श्रमजीवी संघटनेने केला आहे. आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विकास महामंडळ यांच्या मार्फत सद्या खावटी किटचे वाटप सुरू आहे. या वाटपात 12 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू वाटपाची घोषणा शासनाने केली. मात्र, प्रत्यक्षात यातील 1 लिटर खाद्यतेल गायब आहे. आज श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भिवंडी तालुक्यातील संत गाडगेबाबा आश्रम शाळेत असलेले खावटी वाटप होत असताना अचानक भेट देऊन हा प्रकार उजेडात आणला.
हेही वाचा - 'तू मर जा' असे प्रेयसीने म्हणताच, प्रियकराची फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या
केंद्रीय खरेदीत तब्बल 70 कोटी रुपयांचा घपला
श्रमजीवीचे प्रमोद पवार यांनी या पॅक किटला ऑन कॅमेरा अनपॅक करत यात असलेल्या वस्तूचा पार पंचनामा केला. खावटी वस्तूच्या केंद्रीय खरेदीत तब्बल 70 कोटी रुपयांचा घपला करणाऱ्या आदिवासी विकास विभाग आणि महामंडळाने आता खाद्यतेल पळवून आणखी 20 कोटी खिशात घातले असल्याचा आरोप यावेळी श्रमजीवीने केला आहे. कोरोना काळात आदिवासींचा रोजगार गेला, उपासमार आली, त्यामुळे आदिवासींना केवळ रेशनचे तांदूळ न देता त्यासोबत जीवनावश्यक वस्तू द्याव्यात, अशी मागणी श्रमजीवीने केली होती.
११ लाख ५५ हजार कुटुंबांना खावटी अनुदान योजनेचा मिळतो फायदा
मागील वर्षी श्रमजीवीने या खावटीसाठी अनेक आंदोलने केली. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यासाठी स्वतः उच्च न्यायालयात गेले. कडव्या संघर्षांनंतर आज कोरोना आणि लॉकडाऊन संपल्यावर ही योजना प्रत्यक्षात आली. आदिवासींचे स्थलांतर आणि खरेदीत होणाऱ्या दिरंगाईमुळे पूर्ण लाभ लाभार्थ्यांना बँक खात्यात (DBT) द्यावा, अशी मागणी श्रमजीवीने केली. तशीच शिफारस सुकाणू समितीनेही केली, मात्र तरीही राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी महामंडळाचे अध्यक्ष के.सी. पाडवी यांनी अट्टहास करत 2000 चे सामान आणि 2000 बँक खात्यात, असेच धोरण अवलंबले. यासाठी ४८६ कोटी रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. मनरेगावरील चार लाख, आदिम जमातीच्या दोन लाख २६ हजार कुटुंबांना, पारधी जमातीच्या ६४ हजार कुटुंबांना, गरजू, परित्यक्त्या, घटस्फोटीत, विधवा, भूमीहिन अशा तीन लाख कुटुंबाना, तसेच एक लाख ६५ हजार वैयक्तिक वनहक्क मिळालेल्या अशा ११ लाख ५५ हजार कुटुंबांना याचा फायदा मिळेल. खावटी अनुदान योजनेत एका कुटुंबास मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीदडाळ, तूरडाळ, साखर, शेंगदाणे तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती असा दोन हजार रुपये पर्यंतचा किराणा देण्यात येईल, अशी योजना आहे. मात्र, हे सामान खरेदी करताना तब्बल 70 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. हे थोडेच होते तर आता प्रत्यक्ष वाटपातही खाद्यतेल गायब केले. हज आणि मसाला देखील हडपला असल्याचे समोर आले आहे.
आदिवासींच्या तोंडातला घास हिसकावून घेण्याचे पाप
संत गाडगे महाराज आश्रम भिवाळी गणेशपुरी या ठिकाणी सुरू असलेल्या वाटपाच्या ठिकाणी आज श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार, जयेश पाटील, भगवान देसले, संजय कामडी, पारोसा यांच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. हे आदिवासींच्या तोंडातला घास हिसकावून घेण्याचे पाप असल्याची संतप्त प्रतिक्रिया यानिमित्ताने श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिली. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी श्रमजीवी संघटनेने केली आहे.
हेही वाचा - खंडणीच्या गुन्ह्यात दोघांना अटक, १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी