ठाणे : 'केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्रामीण भागात कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. आदिवासी बांधवांसह नागरिकांना देण्यात येणारी लस ही संपूर्ण सुरक्षित आहे. लाभार्थी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करावे', असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी केले आहे. त्याचबरोबर कोविडच्या दुसऱ्या लाटेशी लढताना लाभार्थी नागरिकांचे १०० टक्के लसीकरण होण्यासाठी युद्धपातळीवर माहिती शिक्षण संवादाची (IEC) अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
लसीबाबत गैरसमज
ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये विशेषतः आदिवासी पाड्यांवरील नागरिकांमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरणाबाबत गैरसमजूती असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे लसीकरण करण्यासाठी नागरिक फारसे उत्सुक नाहीत. ही बाब लक्षात आल्यावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करून प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. आज डॉ. रुपाली सातपुते यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ग्रामीण भागातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) चंद्रकांत पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंगे, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, कार्यकारी अभियंता (बांधकाम) नितीन पालवे, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) एच. एल. भस्मे, समाजकल्याण अधिकारी सुनिता मते आदी अधिकारी तसेच सर्व गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
हे आहेत कोविड केअर सेंटर्स
ग्रामीण भागात कोविड रुग्णासाठी कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे. यामध्ये भिवंडी तालुक्यातील भिणार येथे २०८ बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. तसेच शहापूरच्या गोठेघर येथे १०० बेडचे, कल्याण येथील वरप येथे १०० बेडचे आणि मुरबाड येथे ट्रॉमा केअर येथे ७५ बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे.