ठाणे - काही दिवसांपूर्वीच भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा आश्रम शाळेतील ३० विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात १५ ते १८ वयोगटांतील मुला - मुलींसाठी कोविड लसीकरणाचा धडाका लावला असून, १५ जानेवारीपर्यंत ग्रामीणमधील ५३ हजारच्यावर विद्यार्थ्यांचे तर, संपूर्ण जिल्ह्यात १ कोटी १७ लाख ७२ हजार १७ नागरिकांचे लसीकरण १६ जानेवारीपर्यंत झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
हेही वाचा - Woman Murder in Thane : डोंबिवलीत घरात घुसून ५८ वर्षीय महिलेची हत्या; परिसरात खळबळ
ग्रामीण भागातील ५३ हजारच्यावर विद्यार्थ्यांचे लसीकरण
ग्रामीण भागातील पाचही तालुक्यात लसीकरण सत्राचे ३ जानेवारीपासून आयोजन करण्यात आले आहे. १५ जानेवारीपर्यंत ५३ हजार ११० विध्यार्थ्यांचे लसीकरण महाविद्यालयासह आश्रम शाळेत करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३३ लसीकरण केंद्रे विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक लसीकरण अंबरनाथ तालुक्यात १८ हजार ८२५ विद्यार्थ्यांचे झाले. तर, सर्वात कमी मुरबाड तालुक्यात ६ हजार २०६, तर कल्याण तालुक्यात ८ हजार १२, भिवंडी तालुक्यात ९ हजार १७३, तर शहापूर तालुक्यात १० हजार ८९४ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
७५ हजारच्यावर १५ ते १८ वयोगटांतील विद्यार्थ्यांची संख्या
जिल्हातील ग्रामीण भागात ७५ हजारच्यावर १५ ते १८ वयोगटांतील विद्यार्थ्यांची संख्या आहे. त्यामधील जीवनदीप कनिष्ठ महाविद्यालयात १०० टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण आज पूर्ण झाले. कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयातील लसीकरण मोहीम तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत मसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सलग आठ दिवस राबविण्यात आले. आज अखेर महाविद्यालयातील १ हजार १३० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित लक्षात घेता हे लसीकरण विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त ठरणार आहे. सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेता कोविड लसीकरण विद्यार्थ्यांना सुरक्षा कवच ठरणार आहे. तर, आरोग्य विभागाने जीवनदीप महाविद्यालयात लसीकरण उपलब्ध करून दिल्याबद्दल कल्याण तालुका आरोग्य विभाग, पालकांचे सहकार्य महत्वाचे ठरल्याचे संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे यांनी सांगितले.
५० लाख ७५ हजार ७२४ नागरिकांना दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार १६ जानेवारी सायंकाळी साडेसातपर्यंत ठाणे जिल्ह्यातील ५ हजार ५८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी १७ लाख ७२ हजार १७ डोसेस देण्यात आले. तर, जिल्ह्यात आतापर्यंत ६६ लाख ६४ हजार ९३२ नागरिकांना पहिला डोस तर, ५० लाख ७५ हजार ७२४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. काल दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ११८ सत्र आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
हेही वाचा - Bhiwandi Burglary : एकाच रात्री १२ घरफोड्या करणारे 'ते' दोन्ही चोरटे अखेर गजाआड