ठाणे - "हम तो डुबेंगे सनम, लेकिन तुमको भी ले डुबेंगे" असे म्हणत आज ठाणे काँग्रेस अध्यक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय बॉम्बस्फोट केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे नेते नेहमीच काँग्रेसला फसवत आल्याने यापुढे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार नसल्याचे सांगत शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी बंडाचे निशाण उभारले आहे.
त्यांच्या या भूमिकेने या दोन पक्षांतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. राज्यातील महाविकास आघाडीत सगळे काही आलबेल असल्याचे भासवले जात असले, तरीही काही ठिकाणी स्थानिक पातळीवर चित्र वेगळे आहे.
ठाणे काँग्रेस अध्यक्षांच्या या भूमिकेने यंदा मनपा निवडणुकीत नवी समीकरणं पाहायला मिळणार आहेत. एकवेळ शिवसेनेचा हात धरू, परंतू पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले तरीही राष्ट्रवादीसोबत जाणार नसल्याचे चव्हाण यांनी ठणकावून सांगितले. मी इतर अध्यक्षांप्रमाणे नसून, मला राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्याची जबरदस्ती कोणीही करू शकत नाही, असेही ते म्हणाले.
वरीष्ठ पातळीवर मनोमिलन झाले तरीही स्थानिक पातळीवर मात्र नेते आणि कार्यकर्ते यांच्यातील वादविवाद कायम राहतात. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीने कुठे कुठे प्रतारणा केली , याची माहिती दिली.
दरम्यान, कोरोनाविरोधात शासन आणि प्रशासनाने चांगले यश मिळवले असून यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे रुग्णांना त्रास होण्याची शक्यता असल्याने फटाक्यांवर बंदी आणण्याचे निवेदन त्यांनी दिले आहे.