ठाणे - एकीकडे शहरात स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधीचे प्रकल्प आणले जात असून दुसरीकडे ठाणेकरांना पुरेसे पाणी देखील मिळत नसल्याचा आरोप आता प्रशासनावर होत आहे. महासभेत सर्वच नगरसेवकांनी पाण्याच्या मुद्द्यावरून प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले. कळवा, मुंब्रा, आणि दिव्यात एमआयडीसीच्या तर ठाण्यात स्टेमच्या कारभारामुळे पुरेसे पाणी मिळत नाही. घोडबंदरला अजूनही वाढीव पाणीपुरवठा होत नाही, किसननगर भागात तीन दिवस आणि येत नाही. दिव्यात ४१ एमएलडी पाणीपुवठा मंजूर असताना केवळ ३१ एमएलडी पाणी पुरवठा, अशा अनेक मुद्द्यांवर सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला आहे.
ठाणे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी या अंतर्गत कोट्यवधींचे प्रकल्पांची आखणी केली जात आहे. मात्र स्मार्ट सिटीचा अर्थच बहुतेक प्रशासनाला समजलेला नसल्याची टीका प्रमिला केणी यांनी केली. कोव्हिड सारख्या महाभयंकर महामारीच्या काळात कळवा, मुंब्रा, दिवा, घोडबंदर सारख्या उचभ्रू परिसरात आज नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही, जे मिळत आहे ते सुद्धा कमी दाबाने मिळत आहे. अशावेळी स्वच्छता कशी राखायची? असा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कळवा,मुंब्रा आणि दिवा भागात तर पाण्याची समस्या अतिशय गंभीर असून नागरिकांना गरजेपुरते देखील आता पाणी मिळेनासे झाले आहे. कळवा मुंब्रा आणि दिव्याला एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. मात्र एमआयडीसीच्या कारभारामुळे आज ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना टीकेचे धनी व्हावे लागते. वाढीव पाण्याची मागणी तत्काळ सोडवावी आणि ठाणोकरांना पाणी टंचाईतून मुक्त करावे अशी मागणीही सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली.
मागील तीन महिन्यात दुरुस्त्या आणि शटडाऊनमुळे पाण्यावर परिणाम ...
मागील तीन महिने वारंवार शटडाऊन आणि दुरुस्तीचे काम, पाणी पुरवठा करणाऱ्या विविध प्राधिकरणांकडून सुरू आहे. त्यामुळे ठाण्याला कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे यावेळी प्रशासनाने मान्य केले. परंतु तो केव्हा सुरळीत होणार याबाबत मात्र कोणतेही ठोस उत्तर प्रशासनाला देता आले नाही. भातसाकडून १०० एमएलडी, एमआयडीसी कडून ५० एमएलडी तर स्टेम कडून १० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी स्मरण पत्र देखील दिले असल्याचे प्रशासनाच्या वतीने यावेळी स्पष्ट करण्यात आले.