ठाणे - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणेकर नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेल्या कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडले. 'दहीहंडीचा सण साजरा न करता तसेच त्यावर वायफळ खर्च न करता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या मतदारसंघात ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली आहे. हंडीवर खर्च न करता आरोग्य उत्सव साजरा करून ऑक्सिजन प्लांट उभारले असून जनतेची सरनाईक यांनी काळजी घेतली आहे. अशा जनहिताच्या कामातून जनतेचे खरे आशीर्वाद मिळतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतूक -
अनेक जण असे असतात की 'तारीख पे तारीख', 'तारीख पे तारीख' जाहीर करत असतात आणि प्रत्यक्षात काहीच करत नाहीत. पण आमदार सरनाईक यांनी १५ दिवसांपूर्वी माझी या ठाण्यातील ऑक्सिजन प्लांटच्या उदघाटनासाठी वेळ घेतली. तशी तारीख ठरवली आणि हा प्लांट सुरु केला. सरनाईक यांचे अशा उपक्रमांसाठी मला पुन्हा कौतुक करायचे आहे. कोरोनाचा धोका कायम असल्याने एका बाजूला या उत्सवाच्या आनंदावर विरजण आलेले आहे. पण तरीही जनतेच्या उपयोगाचे, जनतेचे प्राण वाचावेत म्हणून 'प्राणवायू निर्मिती प्रकल्प' आमदार सरनाईक यांनी सुरु केला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
'कोरोनाला स्वतःहून आमंत्रण देत आहेत' -
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दहीहंडीबाबत काही सूचना दिल्या होत्या. पण तरीही काही राजकीय पक्षाचे लोक हट्टाने विरोधासाठी विरोध म्हणून रस्त्यावर दहीहंडी साजरे करीत आहेत. असे लोक हे कोरोनाला आमंत्रण देत आहेत. जे कोरोनाला स्वतःहून आमंत्रण देत आहेत, त्यांच्यासाठी हा प्लांट आहे. कोरोनाचे नियम पाळत नाहीत, जे स्वतःहून कोरोनाला निमंत्रण देत आहेत, त्यांना हा ऑक्सिजन लागणार आहे, अशी मिश्कील टीका शिवसेनचे खासदार संजय राऊत यांनी यावेळी कार्यक्रमात केली.
हेही वाचा - महाराष्ट्रात राजकीय काला : दहीहंडी, आगामी सणांवरुन राज्य सरकार-विरोधक संघर्ष पेटणार?