ठाणे - पाच वर्षांच्या मुलाला विचारले तरी, तो युतीचेच सरकार येणार असल्याचं बोलेल; असा खोचक टोला मारत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
प्रचारसभेतबोलताना आज त्यांनी राष्ट्रवादीसह काँग्रेस व मनसे वर जोरदार हल्ला चढवला. यंदाच्या निवडणुकीत आघाडीला किती जागा निवडून येणार याची जाणीव झाल्यानेच त्यांनी एकत्र येण्याची भाषा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. जिल्ह्यात एकाच तिकिटावर वॉटर ट्रान्सपोर्टसह कोणत्याही माध्यमातून प्रवास करता येण्याच्या सुविधेवर काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच केंद्र सरकारशी चर्चा करून ठाण्यासह सर्वत्र मेट्रोचे जाळे उभारणार असल्याचे ते म्हणाले. कोपरी येथील उड्डाणपूल आठ पदरी करून वाहतूक कोंडी दूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि फडणवीस सरकारच्या माध्यमातून कामे पूर्ण होऊन दिल्लीत भगवा फडकल्याने 370 कलम रद्द होऊन सर्जिकल स्ट्राईक केल्याचे सांगितले.
शेतकरी कर्जमुक्ती, मेट्रोचे जाळे, जलवाहतुकीच्या दिशेने वाटचाल, एसारएचा प्रश्न मार्गी लावण्यासारखी अनेक समाजोपयोगी कामे पालकमंत्र्यांनी केल्याचे सांगितले. क्लस्टरच्या माध्यमातून गरिबांना मालकी हक्काचे घर मिळणार असून, काळू धरणाचा रखडलेला प्रश्न देखील युती सरकारने मार्गी लावल्याचे ते म्हणाले. एकीकडे दीपाली सय्यद, दुसरीकडे मी आणि मध्ये सेनेचे प्रताप सरनाईक आणि भाजपचे संजय केळकर हे भरघोस मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
टीकूजी-नी-वाडी ते बोरिवली असा नऊ हजार कोटी रुपयांचा भुयारी मार्ग होणार असल्याची माहिती यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या सभेत रिकाम्या खुर्च्या
या सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खुर्चांच्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र ऐन संध्याकाळाच्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी मोकळ्या खुर्च्या दिसल्या.