ठाणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखाना आणि पाटबंधारे खात्यात होत असलेल्या तथाकथित भ्रष्टाचाराबद्दल भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी आज (गुरूवार) भारतीय जय हिंद पार्टी तर्फे ठाण्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आला होता.
'पवारांवर सूडबुद्धीने टीका'
भारतीय जयहिंद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील तीन हातनाका येथील पूर्व द्रुतगती मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान बाळासाहेब भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमैया यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त केला. प्रश्न व भ्रष्टाचार बाहेर काढायचे असेल तर गुजरात आणि दिल्ली येथे जाऊन भाजपा नेत्यांचे काढा, असे आवाहन बाळासाहेब भोसले यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात आधीच क्लीनचिट दिली असली तरीही केवळ सूडबुद्धीने भाजपा नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येते असा आरोप त्यांनी केला.
आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात -
भारतीय जयहिंद पार्टीचे पूर्ण समर्थन असल्याचे सूतोवाच यावेळी बाळासाहेब भोसले यांनी केले. भाजपा पक्षात सगळेच आलबेल नसून त्यांच्या नेत्यांचे देखील मोठमोठे घोटाळे आहेत ते किरीट सोमैयांच्या घरात घुसून आपण लवकरच बाहेर आणू असा इशारा बाळासाहेब भोसले यांनी दिला. यावेळी पोलिसांनी बाळासाहेब भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
हेही वाचा - केंद्र सरकार राज्याच्या निधीवाटपात भेदभाव करत असल्याचा अजित पवारांचा आरोप, म्हणाले....