ठाणे - ठाणे स्थानकात आज (सोमवारी) तिसऱ्या दिवशी देखील प्रवाशांचा खोळंबा झाला. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकल गाड्या कमी करण्यात आल्या होत्या. मात्र आज पाऊस थांबला असून 'लाईफलाईन' पुर्वस्थीतीत यायची आहे. यामुळे लोकलची वाहतूक 30 मिनिटे उशिराने सुरू असून प्रवाशांचा खोळंबा होत आहे. त्यामुळे स्थानकामध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मध्य रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र आज (सोमवार) सकाळी पावसाचा जोर ओसरल्यामुळे जनजीवन पूर्वस्थितीत येत आहे. यादरम्यान ठाणे रेल्वेस्थानकावर पोहोचलेल्या प्रवाशांचा, लोकल 30 मिनिटे उशिरा असल्यामुळे खोळंबा झाला. पर्जन्यमानाची स्थिती पाहून सोमवारी वाहतूक सुरू राहील, अशी माहीती मध्य रेल्वेने दिली होती. तरीदेखील प्रवाशांना लोकलची वाट पाहावी लागत असल्यामुळे मध्य रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले जात आहेत.