ठाणे - भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या कांदळी या गावाच्या हद्दीत मुंबई-नाशिक महामार्गावर आज (बुधवार) दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. एका चारचाकीचा टायर अचानक फुटल्याने कारचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, टायर फुटल्यानंतर चारचाकी कार गोलांट्या खात विरुद्ध दिशेच्या मार्गावर येऊन आदळली.
हेही वाचा... VIDEO : कोरोना रुग्णाची मृत्यूनंतरही फरपट; चक्क जेसीबीने पुरला मृतदेह..
कारला बसलेली धडक इतकी जोरदार होती की, या धडकेमुळे कारमधील एअर बॅग उघडल्या गेल्याने चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या छातीला काही प्रमाणात मार लागला. परंतु, कारचे इंजिन पूर्णतः दबले गेल्याने त्यामध्ये असलेल्या चालकाशेजारील व्यक्तीचे पाय अडकून पडले होते. हा अपघात घडल्यानंतर स्थानिक युवकांसह रस्त्यावरील वाहन चालकांनी या कारच्या पुढील बाजूचा पत्रा काढत या अपघातातील जखमी व्यक्तींची सुटका केली. त्यानंतर महामार्गावरील रुग्णवाहिकेमधून या चारही जखमींना उपचारासाठी ठाणे रुग्णालयाकडे नेले.
सदर अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पडघा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या भीषण अपघातामध्ये एकूण चार जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान ज्या टेम्पोची धडक कारला बसली तो टेम्पो घटनास्थळा वरून गेलाआहे. कारमधील चौघेही बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने जखमींची नावे समजू शकली नाहीत.