ठाणे - चारित्र्याच्या संशयावरून एका युवकाने आपल्या प्रेयसीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला आहे. यामध्ये तरुण मुलगी गंभीर जखमी झाली असून, भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या युवकाला अटक केली आहे.
हेही वाचा - Elder woman Molested : ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा वॉर्डबॉयकडून विनयभंग, आरोपी जेरबंद
भाईंदर पश्चिम येथील शिवनेरी परिसरात राहणाऱ्या विशाखा माची व धनंजय शिंदे यांच्यात तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपासून विशाखावर चारित्र्याचा संशय घेऊन दोघांमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे, अनेक दिवसांपासून दोघांच्या भेटीगाठी होणे बंद झाले. धनंजय सोमवारी मध्यरात्री तीन वाजता विशाखा माची हिच्या घराखाली पोहचून विशाखाला बोलून तिच्याशी वाद घातला. वाद इतका विकोपाला गेला की, त्याने सोबत बाळगलेल्या चाकूने विशाखाच्या मनगटावर व गळ्यावर हल्ला केला. यामध्ये विशाखा ही जमिनीवर कोसळली. आवाज ऐकून घरातील सदस्य जमा झाले व विशाखाला तिच्या आईने रुग्णालयात दाखल केले.
माहिती मिळताच भाईंदर पोलिसांनी जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या विशाखाची भेट घेऊन संबंधित प्रकरणाची माहिती घेतली असता प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पोलिसांनी विशाखाचा प्रियकर धनंजय शिंदे याला अटक केली असून, भाईंदर पोलीस ठाण्यात ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी दिली.
हेही वाचा - ठाणे : 22 फेब्रुवारी 2022 म्हणून आज 65 जोडपी अडकली विवाहबंधनात