ठाणे - एका बियर बारमध्ये किरकोळ कारणावरून अट्टल गुन्हेगाराने एका तरुणाच्या डोक्यात बीयरच्या बाटल्या फोडून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प ५ च्या मठ मंदिर भागातील रचना बारच्या दारात घडली. बाटल्या डोक्यात फोडतानाचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. भुपेंद्र राठोड असे बियरच्या बाटल्या डोक्यात फोडून गंभीर झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर मुंबईच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मुख्य आरोपी ऋतिक तेजी आणि त्याच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
उल्हासनगर शहरात अनेक गुन्हेगारी कारवायांच्या बैठका आणि प्लॅनिंग बारमधून होत असतांना पोलीस मात्र त्याच्याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप अनेकदा शहरवासीयांनी केला आहे. त्यातच मुख्य आरोपी ऋतिक तेजी आणि त्याचे साथीदार मठ मंदिर भागातील रचना बारमध्ये रात्रीच्या सुमारास भुपेंद्र राठोड आणि त्याचे मित्र बसले होते. यावेळी यातील एका आरोपीने राठोड याच्या मित्रास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी राठोड याने का शिवीगाळ करतो याची विचारणा केली असता आरोपीने गुन्हेगार असलेल्या ऋतिक तेजी याला बोलावून घेतले. तेजीने बारमध्ये गोंधळ घालत भुपेंद्र राठोडला मारहाण करीत त्याच्या डोक्यात बीयरच्या बाटल्या फोडल्या आणि ते सगळे पसार झाले.
पोलिसांचा बोलण्यास नकार-
या प्रकरणी पोलिसांनी कॅमेरासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता दुकाने रात्री दहा वाजता बंद केली जात आहेत. मात्र रेस्टॉरंट आणि बारला यातून सूट दिली जात असल्याचा आरोप देखील केला जातोय.
हेही वाचा- 'महाराष्ट्रातील खटले हिमाचल प्रदेशमध्ये वर्ग करा'; कंगनाची सर्वोच्च न्यायालयात धाव