नवी मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधक व सत्ताधारी यांच्यात खडाजंगी पहायला मिळाली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपाच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आले. याप्रकरणी भाजपाचे आमदार गणेश नाईक यांनी ज्या आशिष शेलारांनी क्रोधीत झालेल्या आमदारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्यांचेच निलंबन झाले ही बाब चुकीची आहे, असे वक्तव्य नवी मुंबई महापालिका मुख्यालय परिसरात केले.
'शेलार यांची त्रयस्थ भूमिका'
सत्ताधारी पक्ष व भास्कर जाधव यास कोणत्याही प्रकारची शिवीगाळ झाली नाही. हा प्रकार घडला तेव्हा मी स्वतः तिथे होतो. त्या अधिवेशनात प्रश्न उत्तरे नव्हती, लक्षवेधी नव्हती, ना कोणत्याही बिलावर बोलायची संधी. त्या ठिकाणी आशिष शेलार यांची त्रयस्थ भूमिका होती. आशिष शेलारांनी क्रोधीत झालेल्या आमदारांना बाहेर काढायचा प्रयत्न केला, मात्र त्यांचेच निलंबन झाले, ही चुकीची बाब आहे. एका आमदाराने सभागृहात वायर खेचली, ते चुकीचे आहे. त्याचे समर्थन मी करत नाही, असेही नाईक यांनी म्हटले आहे.
'जाधव यांना शिवीगाळ केल्याचे माझ्या ऐकण्यात नाही'
भास्कर जाधव हे तालिका अध्यक्ष होते. तालिकेवरून खाली उतरल्यावर इतर आमदार व भास्कर जाधव यांचे अधिकार सारखेच आहेत. सभागृहाच्या बाहेर काय घडले ते मला माहीत नाही, शिवाय भास्कर जाधव यांना कोणी शिवीगाळ केल्याचे माझ्या तरी ऐकण्यात नाही, असे आमदार गणेश नाईक यांनी म्हटले आहे.
या १२ आमदारांचे झाले आहे निलंबन
संजय कुटे, आशिष शेलार, जयकुमार रावल, गिरीश महाजन, अभिमन्यू पवार, हरिश पिंपळे, राम सातपुते, जयकुमार रावल, पराग अळवणी, नारायणे कुचे, बंटी बागडिया आणि योगेश सागर या बारा आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.