ठाणे - महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. भिवंडीत नऊ वर्षाच्या चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. इम्रान इब्राहिम शेख ( वय ३८ ) असे नराधमाचे नाव आहे.
पीडित मुलगी व नराधम एकच इमारतीमध्ये राहत आहेत. नराधम वरच्या मजल्यावर राहतो. पीडित चिमुरडी ही एक वर्षाची असताना तिला आकडी आल्याने तिची बौद्धिक क्षमता कमी आहे. याच बाबीचा नराधम आरोपीने फायदा उचलल्याचे पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितले. आरोपीने पीडित चिमुरडीला घरात कोणी नसताना पहिल्या मजल्यावर बोलावले. तेथे आरोपीने चिमुरडीवर अत्याचार केला.
शेजारील महिलेने पीडितेच्या आईला दिली माहिती
नराधमाच्या अत्याचारामुळे वेदना असह्य झाल्याने पीडित चिमुरडी घराशेजारीच रडत बसली होती. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या महिलेले तिची विचारपूस केली. महिलेने पीडितेवर अत्याचार झाल्याची माहिती फोनवरून तिच्या आईला दिली. आईने घरी धाव घेतल्यानंतर पीडितेने गुदरलेला प्रसंग कथन केला. हे ऐकून आईवडिलांना धक्काच बसला. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात नराधम इम्रान शेख याच्याविरोधात पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
नारपोली पोलिसांनी इम्रान शेखला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत.