ठाणे - दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्यांना धमकावीत अरेरावी करणाऱ्या भिवंडीतील राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक केल्याची घटना ताजी असतानाच नारपोली पोलीस ठाण्यात धिंगाणा घालून पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या तरुण व तरुणी विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. भानुप्रताप अवधेशकुमार सिंग (वय 28 रा.सांताक्रुझ मुंबई), नयना किरण कार्तिक, (वय 25 रा.नेरुळ नवी मुंबई) असे अटक तरुण तरुणीचं नावे आहेत.
नाशिक - मुंबई महामार्गावरील एचपी पेट्रोल पंपाजवळील रूख्मीणी ढाबा येथे ५ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता आरोपी भानुप्रताप अवधेशकुमार सिंग व त्याची मैत्रीण नयना किरण कार्तिक असे दोघेजण ढाब्यावर जेवणासाठी आले होते. मात्र जेवणाच्या बिलावरून त्यांच्यात वाद होऊन या दोघांनी वेटर मारहाण करीत जखमी केल्याने पोलीस नियंत्रण कक्षास फोन व्हर्जन कळताच नारपोली पोलीस ठाण्यातील बीट मार्शल महेश महाले व शिंदे असे दोघे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहून दोन्ही आरोपींनी पोलिसांशी अरेरावी करीत धक्काबुकी करून मारहाण केल्याने पोलिसांना दोघांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस ठाण्यातही या दोघांनी धिंगाणा घालत तेथे कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलीस व एक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करीत गोंधळ घातला.
दोघेही आरोपी पोलीस कोठडीत -
याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यातील महेश महाले या पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारी वरून आरोपी भानुप्रताप अवधेशकुमार सिंग व त्याची मैत्रीण नयना किरण कार्तिक यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. आज या दोन आरोपींना न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे.