ठाणे - बदलापूर खरवाई- मानकीवली एमआयडीसी परिसरात आज दुपारच्या सुमारास केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कंपनीमधील ९ कामगार होरपळून गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बदलापूर खरवाई- मानकीवली एमआयडीसी परिसरात ओमकार केमिकल कंपनी असून या कंपनीच्या बॉयरलमध्ये अचानक जोरदार स्फोट होऊन आग लागली होती. सध्या या कंपनीत बॉयलरचे मोठ्या प्रमाणात स्फोट होत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आग इतकी भीषण आहे की तीन ते चार किलोमीटर परिसरातून दिसते आहे. या आगीत कंपनीत काम करणारे ९ कामगार होरपळले असून गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते आहे.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि एमआयडीसी परिसरातील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग पसरून इतर कंपन्यांना त्याची झळ बसू नये याची खबरदारी अग्निशमन दलाकडून घेतली जाते. या आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.